सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
फुप्फुसाच्या कर्करोगाला कंटाळलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आईनेही आत्महत्याच केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी गोठीवली येथे घडली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मायलेकांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
रेखा सिंग (58) आणि त्यांचा मुलगा सूरज सिंग (35) हे गोठीवली येथील नेहा रेसिडन्सीमध्ये आपल्या कुटुंबासह राहात होते. सूरज याला फुप्फुसाचा कर्करोग होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू असले तरी त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्याने बेडरूममधील छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. हा धक्का त्याची आई रेखा सिंग यांना सहन झाला नाही. त्यांनी त्याच बेडरूममध्ये छताच्या पंख्याला गळफास लावून स्वत:ला संपवले. रेखा यांची मुलगी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले.




























































