बायको न्यायला आला, अन् मेव्हण्याचा खून करून तुरुंगात गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावायाला चांगले नांदवत असाल तर मुलीला नांदवायला पाठवू असे सासरा व मेहुण्याने सांगितल्याचा राग मनात धरुन 9 जानेवारीच्या रात्री मेहुण्याने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. तसेच सासुच्या डोक्यातही जळतनाचे लाकुड घालून मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील मारोती मंदिराजवळ राहणाऱ्या रमाबाई भारतआप्पा महाजन यांची मुलगी सारिका हिचा विवाह औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापुर येथील राजाराम लक्ष्मण आवटे यांच्यासोबत झाला आहे. सासरी घरगुती कारणावरुन त्रास असल्यामुळे सारिका 10 दिवसापासुन सेनगाव येथे माहेरी आली होती. राजाराम अवटे हे पत्नीला घेऊन जाण्यासाठी 8 जानेवारीला सासरवाडीमध्ये आले. त्यावेळी भारतआप्पा महाजन व त्यांचा मुलगा मन्मथ महाजन यांनी त्रास न देता सारिकाला चांगले वागवत असाल तर पाठवू असे आवटे यांना सांगितले. या प्रकाराचा राग आल्यामुळे राजाराम आवटे यांनी मन्मथ महाजन याच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याचे रमाबाई महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तसेच रमाबाई यांच्या डोक्यातही जळतनाच्या लाकडाने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात राजाराम आवटे याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी सांगितले.