
सामना प्रतिनिधी । गडचिरोली
गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. या दीक्षांत समारंभात विविध अभ्यासक्रमातून प्रथम आलेल्या ३३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच ३२ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
सुवर्णपदक विजेत्यामध्ये पल्लवी अडपवार, मोहिनी परशुरामकर, अमरदत्त त्रिपाठी, मयुरी लाडे, आकाश पिंपळकर, मानवी अक्केवार, विजय लांडे, अश्विनी पंचभाई, सुजाता मोरांडे, स्मिता बांबोडे, स्वाती संतपुरिवार, शितल आगडे, आकाश गेडाम, पुष्पा बावणे, सोनी सोयाम, हीना सहारे, कांचन भिंगर्देवे, आरती भगत, नितिषा पठाण, अमोल मोहूर्ले, राहुल रामटेके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच आदिवासी प्रवर्गातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सागर गेडाम, रोहित मेश्राम, अर्जित सिंग तसेच गुरूनानक शिवरकर या विद्यार्थ्यांनाही सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला निमंत्रण नव्हते. त्यामुळे कार्यक्रम लोकप्रतिनिधीविनाच पार पडला. इतर मान्यवरांचीही उपस्थिती नगण्य होती. यावर्षी प्रथमच ‘ड्रेस कोड’विना दीक्षांत समारंभ घेण्यात आला. मात्र, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वनस्पती प्रजाती आणि शेतकऱ्यांचे अधिकार संरक्षण प्राधिकरण कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाचे डॉ. के. वी. प्रभू, प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहूर्ले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. के. व्ही. प्रभू यांच्या हस्ते ३३ सुवर्णपदक आणि ३२ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
































































