पोस्टमॉर्टम आता चिरफाड न करताच; एम्समध्ये ‘व्हर्च्युअल’ प्रयोग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेव्हा एखाद्याचा भीषण अपघात होतो किंवा आत्महत्या करतो तेव्हा त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हा घातपात तर नाही ना याचा छडा लावण्यासाठी पोस्टमॉर्टम म्हणजेच शवविच्छेदन करण्यात येते. यात ऑटोप्सी ही प्रक्रिया पार पाडली जाते. त्यासाठी अनेकदा मृताचे नातेवाईक तयार होत नाहीत. कारण या प्रक्रियेत मृतदेहाची अक्षरशः चिरफाड करावी लागते. पण आता चिरफाड न करताच पोस्टमॉर्टम करणे शक्य होणार आहे. नवी दिल्लीच्या एम्स आणि आईसीएमआरमध्ये आता व्हर्च्युअल प्रयोगाद्वारे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. यात मृतदेहाची चिरफाड होणार नाही.

व्हर्च्युअल ऑटोप्सीच्या माध्यमातून पोस्टमॉर्टम केल्यास मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे चिरफाड केल्याचे निशाण दिसणार नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांच्या भावनाही दुखावणार नाहीत. एम्समध्ये दरवर्षी तीन हजार ऑटोप्सी करण्यात येतात. अनेक प्रकरणे गुंतागुंतीची असतात. त्यामुळे शवविच्छेदन करणे अनिवार्य असते. ऑटोप्सी करण्यासाठी अर्धा तास ते तीन तास लागू शकतात.

काय आहे व्हर्च्युअल ऑटोप्सी

या प्रक्रियेत मृत व्यक्तीचे शरीर, पेशी आणि हाडांना स्पर्श न करता तपासणी केली जाते. शरीर एका बॅगेत पॅक करून सीटी स्कॅनच्या सहाय्याने शरीरातील आतील भागांच्या हजारो प्रती काढल्या जातात. या प्रतींची पुढे फॉरेन्सिकद्वारे तपासणी केली जाते.

असे होईल व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम

एखाद्या दुर्घटनेनंतर मृताच्या हाडांची जखम किंवा फ्रॅक्चरच्या माध्यमातून मरणाऱयाची ऑटोप्सी करण्यासाठी डिजिटल एक्स-रे मशीन तयार केली आहे. व्हर्च्युअल ऑटोप्सीवर सध्या बरेच संशोधन सुरू असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. या प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज असते. नवीन सीटी स्कॅन मशीन खरेदी करावी लागते, एक नवीन पोस्टमॉर्टम खोली तयार करावी लागते. या प्रक्रियेत मृत व्यक्तीचे रेकॉर्ड डिजिटल फॉर्मेटच्या स्वरूपात उपलब्ध असते. या रेकॉर्डची फॉरेन्सिक तज्ञांद्वारे तपासणी करण्यात येते.

ऑटोप्सी ही प्रक्रिया पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्त्वाची असते, परंतु मृतदेहाची चिरफाड करण्यास नातेवाईक तयार होत नाहीत. हे लक्षात घेऊन मी आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे पथक मिळून व्हर्च्युअल ऑटोप्सीसारखा प्रयोग आम्ही करत आहोत. ही प्रक्रिया स्वित्झर्लंड आणि पश्चिमेकडील देशांमध्ये वापरली जाते.    – डॉ. सुधीर गुप्ता (एम्सचे प्राध्यापक आणि फॉरेन्सिक मेडिसीनचे सदस्य)