लेख : नरवीर तानाजी मालुसरे यांचे शौर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रवींद्र मालुसरे

सुभेदार तानाजी मालुसरेंच्या चरित्रापासून स्फूर्ती घेत अनेक लढवय्ये निर्माण झाले. त्यांच्या चरित्रात एवढी ताकद आहे की, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठावी यासाठी तानाजींच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला. या पोवाड्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली. तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळ!

आपला शिवकालीन इतिहास तेजस्वी आहे. पूर्वजांच्या स्वाभिमानाचा, शौर्याचा, निष्ठेचा वारसा हक्क आपल्याकडे आहे. त्यांचा इतिहास जर आपण विसरलो तर आपला भविष्यकाळ काजळलेला दिसेल हे सांगायला नको. ‘शिवरायांचा सिंह पडला समरांगणी मराठा गडी यशाचा धनी’ असा गौरव इतिहासाच्या पानापानांत सुवर्णाक्षरांनी शिवछत्रपतींच्या ज्या सुभेदाराचा झाला आहे त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राला आणि मराठी मनाला सतत स्फूर्तिदायी ठरली आहे. नरवीर तानाजींनी भावनेपेक्षा आणि कर्तव्यापेक्षा स्वराज्याची, किंबहुना राष्ट्रकार्याची हाक ऐकली आणि हे करताना स्वामिकार्यासाठी प्राणार्पण केले.

अकराव्या शतकातील आपत्काळात ‘मल्ल’ घराण्यातील एक शाखा कोकणात जावळी मुलुखात आश्रयास आली. त्या शाखेतील ‘नाईक’ हा नरवीर तानाजी यांचा हुद्दा असावा. प्रतापगड युद्धानंतर किल्ले राजगड स्वराज्यात आल्यानंतर शिवरायांनी तानाजी यांना तावूनसुलाखून पहिल्यानंतर पायदळाचा हजारी मनसबदार केले. मात्र त्यांच्या हाताखालील एक हजार पायदळ जेधे, बादलांसारखे एकाच बिराजरीचे नव्हते, एकाच मुलुखातील नव्हते. मोहिमेप्रसंगी सैन्याबरोबर एक हजार हशमांचे मिश्र पायदळसुद्धा दिले जाई. तानाजी मालुसरे स्वराज्यातील कधीही कोणत्याही वतनी सुभ्यावर नियुक्त नव्हते. छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यात प्रत्यक्ष वतने देण्याचा प्रघात नव्हता. त्याच्याआधी ‘सुभेदार’ हे उपपद लावले गेले. ‘सुभेदार’ या शब्दाचा अर्थ लष्करातील अधिकारी. सुभा म्हणजे प्रांत, पण तानाजी प्रांताधिकारी नव्हते.

तानाजी मालुसऱ्यांचे पूर्वज तापी नदीच्या उतारावर सातपुड्याच्या जंगलकाठावरचे मूळचे लढवय्ये. म्हणूनच आधी दौलताबाद, नंतर नगर व वाईला आले. शेवटी ते पाचगणीजवळील गोडोलीला येऊन राहिले. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी व त्यांचा भाऊ भोवरजी किंवा भोरजी हे गोडोलीचे रहिवासी. या गोडोलीवर परक्यांची स्वारी नेहमीच येई. म्हणून काळोजी व भोरजी यांनी शिवाजी महाराजांचा पक्ष घेतला आणि फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळी त्याचे पारिपत्य करण्याची प्रतिज्ञा या दोन्ही भावांनी वाईजवळच्या आकोशी व नालवाडी या गावी घेतली. आसगावच्या शिंगाण नावाच्या डोहाजवळ झालेल्या सभेत या दोन्ही भावांनी विडे उचलले. वाईच्या सुभेदाराला ही बातमी लागली. त्याने गोडोलीवर अचानक हल्ला करून या दोन भावांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले आणि एकाएकी एके रात्री विजापूरकरांचा वाईचा सुभेदार त्या गावात आला. त्याने त्या गावावर अचानक हल्ला करून संपूर्ण गाव बेचिराख करून काळोजी, भोरजी व गोडोलीच्या शूर गावकऱ्यांची कत्तल केली. भोरजींचे मुलगे त्यांच्या मामांकडे कोयना खोऱ्यात फुरस गावाला गेले, तर तानाजी व सूर्याजी या बारा व दहा वर्षांच्या मुलांना घेऊन त्यांची मातोश्री आसऱ्यासाठी प्रतापगडाच्या खाली करंजे गावातून उमरठला आली. तोपर्यंत त्यांचा भाऊ शेलार त्यांचा शोध घेत उमरठला पोहोचले होते. शेलारमामांनी त्यांच्या वाट्याला आलेले दुःख गावकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी एक खोपटं बांधून दिले आणि नाचणी, वरी पिकविण्यासाठी काही एकर वरकस जमीनही दिली. त्या उमरठ गावात तानाजी आणि सूर्याजी हे बंधू आठ-दहा वर्षांत गावचेच नव्हे, तर साखर खोरे, कामथे खोरे, किनश्वर खोरे, गोळेगणी खोरे आणि शिवथर खोऱ्यातही प्रसिद्ध झाले होते. शरीर कमावण्यासाठी ते जोरजोडी, मल्लखांब करीत व दिवसभर काबाडकष्ट करीत. तलवार, भाला, बोथाटी चालवता चालवता तानाजी समशेरबहाद्दर झाले. दांडपट्टय़ाचे हात इतके सफाईने करीत की, पट्टा चालविणारे सराईत वेळगडी त्यांच्याकडे टकमक पाहत राहत. वेष पालटण्यातही ते तरबेज होते. सरदारी पोशाखात ते आपल्या जाडजूड काळ्या मिश्यांना पीळ घालून बसले म्हणजे त्यांचा थाट सरदारी दिसे. दोन्ही भाऊ शेती करीत अन् लढाईचे डावपेच शिकत. महाड प्रांतात मोठे प्रख्यात झाले.

अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी तानाजींचे मावळे करंजे-देवळे व गोळेगणी-पैठणच्या खोऱ्यात सशस्त्र तयार होते. तानाजी स्वतः प्रतापगडावरच भेटीचा सर्व प्रकार दिसेल अशा ठिकाणी बसलेले होते. खानाचा कोथळा बाहेर येऊन तो कोसळल्यानंतर सय्यद बंडा भेटीच्या जागी तीरासारखा धावत गेल्यावर तानाजीही धावत गेले. संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला व तानाजी यांनी त्याचा चेंदामेंदा करून टाकला. तानाजी यांनी जावळी खोऱ्याच्या खाली असलेल्या या खोऱ्यात तरुणांची एकजूट केली. त्यामुळे  15 जानेवारी 1656 या दिवशी जावळीचा पाडाव झाला.  शिवरायांचे काम सोपे झाले. जावळी पूर्णपणे ताब्यात येऊन गुढय़ा डोंगराच्या जुन्या गढीचे स्वरूप प्रतापगडात करण्यात आले.

सिंहगडावरील कोंढाणेश्वराच्या देवळाच्या खालच्या अंगास दक्षिणाभिमुख अमृतेश्वर मंदिर आहे. भैरव व भैरवीच्या दोन मूर्ती असून भैरवाच्या चार हातात आयुधे आहेत. जवळच एक कुत्रा कोरलेला आहे. येथे यात्रा व मोठा उत्सव होत असे. त्याकाळी जवळजवळ दोनशे रुपये खर्च येत असे. 1763 मध्ये भाऊसाहेब पेशव्यांची पत्नी पार्वतीबाई यांनी अमृतेश्वराला सोन्याचा मुकुट दिला होता. 1777 मध्ये नवी मूर्ती बसवण्यात आली. या देवळामध्येच नरवीर तानाजी यांची समाधी, म्हणजे एक चौकोनी शिखराचे वृंदावन होते. त्यावर 1940 मध्ये त्यांचा अर्धपुतळा व समाधीचे नूतनीकरण करण्यात आले. तानाजींच्या जुन्या तुळशीवृंदावनाची जागा ही तानाजीचा देह पडल्याची जागा म्हणजे वीरमरणाची जागा होय. सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या देहसमाधी रूपात राज्याला एक ऐतिहासिक भेट मिळाली आहे.  

आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पवित्र्यातील सहा फूट उंचीचा भव्य पुतळा आहे, तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील मालुसरे मंडळी 1930 पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला जाऊन आजतागायत नतमस्तक होत शौर्यदिन साजरा करीत असतात.

सुभेदार तानाजी मालुसरेंच्या चरित्रापासून स्फूर्ती घेत अनेक लढवय्ये निर्माण झाले. त्यांच्या चरित्रात एवढी ताकद आहे की, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठावी यासाठी तानाजींच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला. या पोवाड्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली. तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळ!

(लेखक मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत)