जिल्ह्या परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मारहाण प्रकरण; प्रशासनाने घेतला धसका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

निमंत्रण पत्रिकेत नाव न छापल्‍याच्‍या कारणावरून अधिकाऱ्याला झालेल्‍या मारहाणीचा रायगड जिल्‍हा परिषद प्रशासनाने चांगलाच धसका घेतला आहे. आता सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्‍या दालनात सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्‍याचा विचार गांभीर्याने सुरू झाला आहे.

रायगड जिल्‍हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्‍कार वितरण सोहळा नुकताच रोहा येथे पार पडला. 150 जणांना पुरस्‍कारांची खिरापत वाटल्‍यामुळे माध्‍यमे आणि समाज माध्‍यमांच्‍या टीकेचा धनी ठरलेला हा सोहळा अजूनही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमामुळे जिल्‍हा परिषदेतील उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर रायगड जिल्‍हा परिषदेतील अधिकारी चांगलेच धास्‍तावले आहेत. मारहाण झालेले अधिकारी ओसवाल यांच्‍या दालनात सीसीटीव्‍ही कॅमेरे नाहीत. जिल्‍हा परिषदेत केवळ मुख्‍य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी या दोन अधिकाऱ्यांच्‍याच दालनात सीसीटीव्‍ही कॅमेरे आहेत. यापूर्वीदेखील अधिकाऱ्यांच्‍या दालनात सीसीटीव्‍ही लावण्‍याचा विषय चर्चेत होता, परंतु निधी नसल्‍याने ते काम होवू शकले नाही. आता खुद्द उपमुख्य कार्यकारी अधिकारी मारहाणीच्‍या घटनेनंतर हा विषय पुन्‍हा चर्चेत आला आहे. जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे हेदखील याबाबत आग्रही आहेत. त्‍यांनी यासंदर्भात माहिती घेतली असून लवकरात लवकर सीसीटीव्‍ही कसे लावता येतील, याचा विचार सुरू आहे.

रायगड जिल्‍हा परिषदेत अधिकाऱ्यांना मारहाण दमदाटीचे प्रकार नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे. तत्‍कालीन समाजकल्‍याण अधिकारी प्रमोद जाधव, लेखाधिकारी (कॅफो) लक्ष्‍मण पाटील, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. हुकुमचंद पाटोळे अशी नावे वानगीदाखल सांगता येतील. अशा घटनांनंतर त्‍या घटनांचा निषेध झाला, काळया फिती लागल्‍या पुढे त्‍या अडगळीत गेल्‍या. यावेळी तर निषेध नाही काळया फितीदेखील नाही. मारहाणीच्‍या घटनेनंतर निखीलकुमार ओसवाल जिल्‍हा परिषदेकडे फिरकले देखील नाहीत. त्‍यांनी साधी तक्रारही पोलीसात किंवा अधिकाऱ्यांच्‍या संघटनेकडे दिलेली नाही.