
सामना प्रतिनिधी । मुंबई
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला असून गेल्या सहा दिवसांपासून फरार असलेल्या तीन डॉक्टरांपैकी एक डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. इतर दोघींनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.
22 मे रोजी डॉ. पायलने तीन महिला डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड होताच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. भक्ती मेहेर या तिघींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या तिघीजणी अटकेच्या भीतीने फरार झाल्या होत्या.
या तिन्ही डॉक्टरांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती आणि ती राज्याबाहेरही रवाना केली होती. मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणातील पहिली अटक केली. डॉ. भक्ती मेहेर हिला ताब्यात घेतले. बुधवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून त्या तिघी कुठे होत्या, एकत्रच होत्या का, त्या दोघीजणी कुठे आहेत, सर्वजणी कुणाच्या संपर्कात होत्या, आत्महत्या प्रकरणात त्यांचा रोल काय, अशी सर्व चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दोघींनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतल्याचे समजत.
सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरिता ताब्यात घेतली आहेत. त्या फुटेजवरून काही गोष्टींचा उलगडा होणार आहे तर काही निवासी डॉक्टरांचे जबाब नोंदवण्याचे काम पोलीस करत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवले असून त्यात डॉक्टर ते विभागप्रमुख यांचा समावेश आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी करतानाच डॉ. पायल यांनी आत्महत्या कशामुळे केली, कारण काय हे आम्हालाही ठाऊक नाही. तरीही आमच्यावर थेट आरोप करणे हा आमच्यावर अन्याय आहे, असे त्या तिघींनी म्हटले आहे. सध्या आम्ही प्रचंड तणावाखाली असून यातून बाहेर पडण्यासाठी मदत करा, असे आवाहनही त्यांनी मार्डला केले आहे.
कामाच्या ताणाला रॅगिंग कसे म्हणणार? ‘त्या’ तीन डॉक्टरांचा ‘मार्ड’ला सवाल
‘त्या’ तिघींनी ‘मार्ड’ला ‘‘कामाच्या ताणाला रॅगिंग कसे म्हणणार?’’ असा सवाल करून आपण निर्दोष असल्याचा ई-मेल ‘मार्ड’ला पाठवला आहे. निवासी डॉक्टर म्हणून काम करताना कामाचा प्रचंड ताण असतो आणि त्या ताणालाच रॅगिंग म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. तीन वर्षे निवासी डॉक्टर म्हणून आपण काम करतो. त्या काळात रुग्णाची निगा आणि त्याच्या जीवाला सर्वोच्च प्राधान्य देतो. हे चुकीचे आहे का? जर प्रचंड कामाच्या ताणाला कुणी रॅगिंग म्हणणार असेल तर आपण सर्वच जण कुणाच्या तरी रॅगिंगचा बळी ठरलो होतो का? असा प्रश्न त्या तिघींनी ‘मार्ड’ला केला आहे. जर हे सगळे खरे असेल तर सर्वांनी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख यांना दोष द्यायला हवा, असेही पत्रात म्हटले आहे.
पायलने आत्महत्या नाही केली,तिची हत्या झाली! पतीसह पालकांचा प्रचंड संताप
‘आमच्या पायलने आत्महत्या नाही केली, तर तिची हत्याच झाली’ असा सनसनाटी आरोप पायलचे पती आणि पालकांनी मंगळवारी केला. ‘घटनेच्या आधी तीनही वरिष्ठ वैद्यकीय विद्यार्थिनींनी पायलच्या रूमवर जाऊन दरवाजा ठोठावून वाद घातला होता. तिचा गळा दाबला’, असे पायलचे पती सलमान तडवी यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा निषेध करीत पायलच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी मंगळवारी सलग दुसऱया दिवशी नायर रुग्णालयात जोरदार आंदोलन केले.
या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पायलच्या कुटुंबीयांसह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, दलित आदिवासी अल्पसंख्याक, आदिवासी तडवी भिल्ल समाज, आदिवासी तडवी समाज (उल्हासनगर) आदी संघटनांनी मंगळवारी सकाळी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.
दोषींवर कारवाई होईल -महाजन
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करू, कुणीही सुटणार नाही असे आश्वासन दिले.
‘त्या’वेळी आरोपी डॉक्टर रूमबाहेर काय करीत होते?
पायलने आत्महत्या केली तेव्हा 6.50 वाजले होते, मात्र त्याआधी आरोपी डॉक्टर तिच्या रूमबाहेर काय करत होत्या, असा सवाल पायलचे पती सलमान यांनी उपस्थित केला आहे. ही घटना होण्याआधी त्यांनी पायलशी जोरदार वाद घातला होता, असे सलमान यांनी सांगितले. पोलिसांच्या परवानगीशिवाय तिचा मृतदेह त्यांनी खाली कसा आणला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. संबंधित तीनही वरिष्ठ डॉक्टर्स पायलचा मानसिक छळ करत असल्यामुळे तिच्या आई अबेदा यांनीही तिला पतीच्या म्हणजे माझ्या रूमवर जाऊन राहण्यास सांगितले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
पाचजण निलंबित
महापालिकेनेही आता या प्रकणाची चौकशी सुरू केली असून तीनही आरोपी डॉक्टरांसह युनिटप्रमुख आणि विभागप्रमुखांना निलंबित केले आहे. पायलच्या मानसिक छळाबाबत तक्रार आली होती. मात्र ऍण्टी रॅनिंग कमिटीला किंवा रुग्णालयाच्या अधिष्ठातांना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली नाही, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. नोटीस पाठवूनही फरार डॉक्टर कमिटीसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिल्या नाहीत. तसेच अनेक दिवस गैरहजर राहिल्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.































































