
राज्याचा कारभार हाकणाऱया मंत्रालयातच आज 20 मिनिटांसाठी बत्ती गुल झाली. मुख्य इमारतीतच वीज पुरवठा खंडित झाल्याने या इमारतीतील मंत्री कार्यालये तसेच काही विभागांचे काम काही काळासाठी खोळंबले होते. मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात आले.
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील वीज पुरवठा सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास अचानक खंडित झाला. यामुळे मंत्रालयातील वीज विभागाच्या अधिकाऱयांची एकच तारांबळ उडाली. सुरुवातीला वीज पुरवठा खंडित झाल्याचे नेमके कारण कळत नव्हते. मात्र वीज विभागाच्या कर्मचाऱयांनी बेस्ट कार्यालयाशी संपर्क साधला असता मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती बेस्टला मिळाल्यानंतर अवघ्या सातच मिनिटांत 12 वाजून 10 मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.




























































