
महिलांचे दागिने हिसकाविणाऱ्या इराणी टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. गुन्हेगारी टोळ्यांबरोबरच सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीअकबर हुसेन इराणी (30), हैदरअली अब्बासअली सिया (30, दोघेही रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पाषाण सुस रस्त्यावर कुमार शांती निकेतन येथून 18 जानेवारीला रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जेष्ठ महिला दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यावेळी दोघा आरोपींनी महिलेला चापट मारून तिची सोनसाखळी हिसकावली होती. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अली अकबर व हैदर अलीला गुन्ह्यात अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, फसवणूक असे 7 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाईही करण्यात आली आहे. तपासादरम्यान टोळी प्रमुख अलीअकबर हुसेन याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून विविध प्रकारचे गुन्हे केल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोराळे यांनी कागदपत्रांची पडताळणी करून मोक्का अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली.


























































