
बहे गावाच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. महिलेने 50 हजार रुपये मागितल्याने तिचा खून करणाऱ्या आरोपीला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे.
मंगल पांडुरंग गुरव (46, रा. नेर्ले, ता. वाळवा) असे मृत महिलेचे नाव असून, अशोक पांडुरंग डेळेकर (46, रा. कापूसखेड, ता. वाळवा) याला पोलिसांनी अटक केली आहे.
बहे गावाच्या हद्दीत 9 एप्रिलला एका महिलेचा मृतदेह आढळला होता. याबाबत कासेगाव पोलिसांत मृत मंगल यांचा मुलगा अक्षय याने मिसिंगची फिर्याद दिली होती. त्यानुसार या महिलेची ओळख पटली. तपासादरम्यान, अशोक डेळेकर याच्याशी या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्या दोघांमध्ये झालेल्या फोनवरील संपर्काच्या आधारावर कसून चौकशी केली असता डेळेकर यानेच मंगल गुरव यांचा खून केल्याची कबुली दिली.
अनिल जाधव, प्रवीण साळुंखे, दीपक ठोंबरे, शरद जाधव, अरुण पाटील, शरद बावडेकर, आलमगीर लतिफ, भरत खोडकर, किरण मुदूर, अमोल सावंत, सचिन सुतार, आनंदा देसाई, शशिकांत माने, विनय माळी, कॅप्टन गुंडेवाड यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.




























































