कोरोनाचा नवा स्ट्रेन करतोय डोळे आणि कानावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रकोप देशभरात वाढत आहे. तसेच तो सतत म्युटेट होत असल्याने म्हणजेच रुप बदलत असल्याने चिंता  व्यक्त होत आहे. गेल्या चोवीस तासात दोन लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये कोरोनाची लाट जास्त धोकादायक असून आता कोरोनाची आणखी नवीन लक्षणे दिसत आहेत.  आता कोरोना व्हायरस डोळे आणि कान यावर हल्ला करत असल्याचे दिसून आले आहे.

देशात कोरोनाने कहर केला आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना कोरोनाची आणखी नवी लक्षणे दिसून आली आहेत. यावेळी कोरोना विषाणूचे संक्रमण कान आणि डोळ्यावर हल्ला करत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यावर ताप, पोटदुखी, डायरिया, अपचन, गॅस, भूक न लागणे, अंगदुखी आणि अॅसिडीटी सारखी लक्षणे दिसत होती. आता यात कान, डोळ्याची आणखी भर पडली आहे. अनेक कोरोना बाधितांनी डोळे आणि कानाशी संबधित त्रास होत असल्याचे दिसून आले आहे.

एसजीपीजीआय आणि केजीएमयूसोबत अनेक कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना ऐकू कमी येणे, दृष्टीदोष याचा त्रास वाढला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात असे अनेक रुग्ण आहेत त्यांना कमी ऐकू येत आहे. त्याचबरोबर दृष्टीदोषही जाणवू लागला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कोरोना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करण्याची शक्यता आहे.

कोरोनाने ज्याप्रकारे आपले रुप बदलले आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यावर कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे. त्यात नवीन स्ट्रेन रोगप्रतिकारशक्ती चांगल्या असलेल्या व्यक्तीला नुकसान पोहोचवत नाही. त्यांचा बरा होण्याचा काळ जलद आहे. आरएमएल रुग्णालय, लखनऊच्या मेडिसिन विभागाचे मुख्य डॉक्टर विक्रम सिंहचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा दुसरा स्ट्रेन धोकादायक असून तो लोकांना लगेच आजारी पाडत आहे.