
>> नीलय रमाकांत वैद्य
मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग क्षेत्रातले नावाजलेले गुरुवर्य स्कॉट कूक. त्यांचं व्यक्तिमत्त्व, देहबोली, वाक्चातुर्य आणि गाढा अभ्यास यामुळे क्षणार्धात ते विद्यार्थ्यांना आपलंसं करतात. स्कॉट यांनी मॅनेजमेंट गुरू म्हणून आपलं स्वतःचं ब्रॅण्डिंग चातुर्यानं केलंय.
डॉ. अमित बागवे यांनी लिहिलेल्या ‘लोकप्रिय ब्रॅण्ड कसा बनवावा’ या पुस्तकाची किमया काहीशी स्कॉट कूक यांच्यासारखी आहे. अर्थसाक्षर प्रकाशित हे छोटेखानी पुस्तक पदोपदी ब्रॅण्डिंगचं व्यवसायातील महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतं. त्यात ते शब्दागणिक यशस्वी होत राहतं. या पुस्तकाची गंमत अशी की यात थेट यशस्वी मराठी उद्योजकांचे विचार प्रश्नोत्तरं स्वरूपात मांडले आहेत. उगाच शब्दबंबाळ थिअरीचा फाफटपसारा इथे नाही. विशेष म्हणजे यशस्वी मराठी उद्योजकांची निवड बागवे यांनी मोठय़ा शिताफीने केली आहे. यात ‘विको’चे संजीव पेंढारकर, ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’चे आशीष पेठे, ‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई, ‘ठाणे जनता सहकारी बँक’चे सुनील साठे आणि इतर उद्योजकांचा त्यांच्या ब्रॅण्डसह समावेश आहे.
सत्तरीकडे आगेकूच करणाऱया ‘विको’ या बॅण्डविषयी सांगताना संजीव पेंढारकर म्हणतात, ‘आमच्या आजोबांचे स्वप्न होते. कोणत्याही प्रकारे लोकांची दिशाभूल न करता आपण उत्तम प्रॉडक्ट द्यायचे. पैसे तर सगळेच कमावतात. पण आपली नीतिमूल्य जपून, ग्राहकांची फसवणूक न करता आपलं प्रोडक्ट बाजारात आलं पाहिजे.’
‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’चे आशीष पेठे सांगतात, ‘ग्राहकांचा विश्वास जपत काळानुरूप बदल करणं हे आमच्या यशाचं सूत्र आहे.’
काही वर्षांपूर्वी ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ या जाहिरातीने धुमाकूळ घातला होता. पितांबरीची ही जाहिरात घराघरात पोहोचली. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांची ती लाडकी जाहिरात. ‘पितांबरी’ हा ब्रॅण्ड या जाहिरातीमुळे एका वेगळय़ाच पातळीवर गेला. एका उत्पादनात ब्रॅण्डिंग काय चमत्कार घडवू शकतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण.
डॉ. अमित बागवेंनी ‘लोकप्रिय ब्रॅण्ड कसा बनवावा’ या पुस्तकाचं ब्रॅण्डिंग मोठय़ा हुशारीने केलंय. पुस्तकाचं प्रकाशन संजीव पेंढारकर यांच्या हस्ते थेट हेलिकॉप्टरमध्ये केलं. तो दिवस म्हणजे स्वतः अमित यांचा चाळिसावा वाढदिवस. आपण जर या अनोख्या पुस्तक प्रकाशनाचा नीट विचार केला तर यात तीन वेगवेगळय़ा गोष्टींचं ब्रॅण्डिंग झालंय. एक म्हणजे हे पुस्तक, दुसरं म्हणजे पेंढारकरांची विको आणि तिसरं म्हणजे स्वतः डॉ. अमित बागवेंचं ब्रॅण्डिंग! यालाच म्हणतात ब्रॅण्डिंगचं गारूड!!
लोकप्रिय ब्रॅण्ड कसा बनवावा
लेखक ः डॉ. अमित बागवे
प्रकाशक ः अर्थसाक्षर प्रकाशन
मूल्य ः रुपये 200/-






























































