
2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीदरम्यान झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए न्यायालयाने चार दोषींना फाशीची, दोन दोषींना जन्मठेपेची, दोघांना 10 वर्षांची आणि एकाला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा यांनी इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दिकी आणि अझरुद्दीन यांना 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले. तर फखरुद्दीनला पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले. याप्रकरणी एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यापैकी एका आरोपीचे वय कमी असल्याने हा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता.
काय आहे प्रकरण?
बिहारच्या पाटणा येथील गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मैदानात बॉम्बस्फोटांची मालिका घडली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. हैदर अली आणि मुजिबुल्ला हे गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएने आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता इम्तियाजने अनेक नावे पुढे केली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. या चौकशीत बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणही उघड झाले होते.




























































