
बंगळुरूत एका दाम्पत्याने त्यांच्या टेलरविरोधात साडी जाळल्याची तक्रार करत ग्राहक मंचात याचिका दाखल केली होती. तब्बल दोन वर्ष चाललेल्या या खटल्यात दाम्पत्य विजयी झाले असून ग्राहक न्यायालयाने त्या टेलरला साडीची मूळ किंमत व सोबत दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
बंगळुरूतील मैसूर सिल्क येथून 75 वर्षीय एवानी यांनी त्यांची पत्नी मंगला यांच्यासाठी 21 हजार रुपयांची सिल्कची साडी घेतली होती. पत्नीला त्यांनी ती साडी भेट म्हणून दिली. त्यानंतर मंगला यांनी ती साडी त्यांच्या घराजवळीलच दिव्या यांच्या बुटीकमध्ये फॉल बिडिंग करायला दिली. काही दिवसात साडी देते असे सांगून दिव्याने ती साडी ठेवून घेतली.
काही दिवसांनी दिव्याने मंगला यांना फोन करून तुमची साडी आतून जळालेली आहे असे सांगितले. ते ऐकून मंगला यांना धक्का बसला. मंगला यांनी आपली साडी जळालेली नसल्याचे त्यांना सांगिले. मात्र दिव्याने ते कबूल केले नाही. दिव्या तिची चूक मान्य करत नसल्याने मंगला व त्यांच्या मुलीने ग्राहक मंचात धाव घेतली. मंगला यांनी वकिलामार्फत दिव्याला नोटीस बजावली.
न्यायालयात दिव्याने आपण कामात व्यस्त असल्याने मंगला यांची साडी तपासून घेतली नसल्याचा युक्तीवाद केला. तसेच नंतर जेव्हा आपण साडीची घडी सोडली तेव्हा ती आतून जळाल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने सिल्कच्या कपड्यांची महागडी साडी तुम्ही तपासून घेणे गरजेचे होते. तुम्ही कामात गोंधळ केल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे तुम्हाला साडीची किंमत व दहा हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तब्बल दोन वर्ष चाललेल्या या खटल्यानंतर मंगला यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. न्यायालयाने तीस दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम मंगला यांना देण्याचे आदेश दिले आहे.



























































