
पीव्हीसी पाइपचे जुने तुकडे, नारळ्याच्या शेंडय़ा, नायलॉनची जुनी जाळी या टाकाऊ वस्तूंपासून आयताकृती तराफे तयार करण्यात आले आहेत. या तराफ्यावर पाणी शुद्ध करणाऱ्या वाळा, खस आणि कर्दळ अशा वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. अशा पद्धतीचे चार तराफे पुण्यातील राम नदीच्या उगमापाशी सोडण्यात आले आहेत.
याआधी नदीच्या पाण्यात फक्त जलपर्णीच होती. मात्र आता मासे सोडण्यात आले आहेत. तसेच कमळाच्या बियाही सोडण्यात आल्या आहेत. नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी अनोखे तराफे तयार केले आहेत. मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्या वनस्पती शुद्ध करतात, अशा वनस्पतींची लागवड तराफ्यावर करून असे तराफे राम नदीच्या पाण्यात सोडले आहेत. त्यामुळे हळूहळू नदीचे पाणी शुद्ध होऊ लागले आहेत.
पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा संस्थेकडून गेल्या काही वर्षांपासून राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुण्यातील 32 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या फिरत्या तराफ्यांच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. सध्या असे चार तराफे राम नदीच्या पाण्यात सोडण्यात आले आहेत. तराफ्यांनी हळूहळू आपले काम सुरू केले आहे. त्यांच्यामुळे राम नदीचे प्रदूषित पाणी स्वच्छ होऊ लागले आहे.
राम नदी बावधन, पाषाण, बाणेर अशा मध्यवर्ती भागांतून 20 किलोमीटरचं अंतर पार करत मुळा नदीला जाऊन मिळते. ही नदी प्रदूषित झालेली आहे. आता इकोलॉजिकल फ्लोटिंग बेडचा वापर करून ती स्वच्छ करण्याचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.





























































