‘सध्या साखर आणि गव्हाचे उत्पादन चांगले झाले आहे. शेतकऱयांसाठी ही मोठी संधी होती, पण केंद्र सरकारने या दोन्हींच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे शेतकऱयांचे नुकसान होणार असून त्याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. शेतकऱयांना दोन पैसे जास्त मिळू लागले तर सध्याच्या केंद्र सरकारला बघवत नाही,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केली.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर यावेळी सडकून टीका केली. ‘सहकारी तत्त्वावर देशातील पहिला साखर कारखाना धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जिह्यात झाला. पूर्वी केंद्रामध्ये शेतकऱयांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. आम्ही केंद्रात सत्तेवर असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात होते. आता शेतकऱयांना थोडे जास्त पैसे मिळू लागले की केंद्र सरकारची धोरणे बदलली जातात. चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱयांनी आणि कारखान्यांनी आता केवळ साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल, अल्कोहोल, वीजनिर्मिती यावरही भर दिला पाहिजे,’ असे शरद पवार म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव ढाकणे, आमदार नीलेश लंके, संग्राम जगताप, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले उपस्थित होते.



























































