
कश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी आज ईडीने जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची चौकशी केली. राज्यात जूनमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक होईपर्यंत हे असेच चालायचे, निवडणूक होईपर्यंत हा त्रास सहन करावाच लागेल, असा टोला अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला लगावला.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची आज राजबाग येथील कार्यालयात सकाळी चौकशी करण्यात आली. कश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक घोटाळय़ात मनी लॉण्डरिंग झाले आहे असा दावा करत ईडीने त्यांना 27 मे रोजी समन्स बजावले होते. आज ते सकाळी ईडी कार्यालयात जात असताना त्यांना माध्यमांनी ईडी समन्सवर विचारले असता मला समन्सबद्दल जास्त काही सांगता येणार नाही, पण विधानसभा निवडणूक होईपर्यंत हे असेच चालायचे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याआधी 2019 मध्ये अब्दुल्ला यांची ईडी चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे ईडीचे समन्स मिळणे ही सामान्य गोष्ट झाली आहे, असा संताप विरोधी पक्षांनी व्यक्त केला.



























































