
आयसीएफच्या पारंपरिक कोचची निर्मिती 2016 पासून रेल्वे बोर्डाने बंद केली असून आता प्रत्येक ट्रेनला आधुनिक तंत्रज्ञानाचे हलके, पण मजबूत ‘एलएचबी’ तंत्रज्ञानाचे डबे जोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक डब्यांमागे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता जरी वाढत असली तरी या डब्यांचा प्रवाशांपेक्षा रेल्वेलाच अधिक फायदा होत आहे.
एलएचबी डबे नव्या थ्री फेज तंत्राचे असल्याने ‘हेड ऑन जनरेशन’ (ओएचईच्या विजेवर डब्यातील वीज उपकरणे चालविणे)साठी अत्यंत फिट बसतात. तर पारंपरिक आयसीएफ कोच टू फेजचे असल्याने त्यात ‘हेड ऑन जनरेशन’ तंत्र वापरण्यासाठी सर्किट बदल करावा लागतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
मरेच्या 65 तर परेच्या तीन ट्रेन एलएचबी होणार
मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण 103 ट्रेन असून त्यापैकी 56 ट्रेनचे एलएचबी डब्यांमध्ये परिवर्तन केले आहे. पंजाब मेल, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड, पंचवटी, अमरावती आदी मेल-एक्स्प्रेसना एलएचबी डबे जोडले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत आणखीन नऊ ट्रेनला हे आधुनिक डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या 66 टक्के ट्रेन या एलएचबीच्या तंत्राने सुरक्षित होणार आहेत. तर पश्चिम रेल्वेकडे एकूण 186 ट्रेन असून त्यापैकी 107 ट्रेन एलएचबीच्या असून या आर्थिक वर्षात तीन ट्रेन एलएचबी होणार आहेत.
आसनांची रचना गैरसोयीची
या डब्यातील सेकंड क्लास चेअरकारमध्ये प्रवाशांना अक्षरशः कोंबावे अशा पद्धतीने त्यांच्या आसनांची रचना केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचे तोंड एकीकडे तर खिडकी भलतीकडे असे प्रकार घडले आहेत. तसेच डब्याच्या कडेला लागून असलेली आसनेदेखील गैरसोयीची आहेत. कोपऱयात टोकाला बसलेल्या प्रवाशाला जर उठायचे असेल तर त्याच्या रांगेतील सर्व प्रवाशांना आधी उठवावे लागते.



























































