
शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरात गावठाण आणि पश्चिम भाग आज जोरदार पावसाने झोडपून काढला. विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तुफानी बॅटिंग केली. गावठाणातील जनावरांच्या दवाखान्यासमोरील सुमारे 150 वर्षांचे वडाचे मोठे झाड उन्मळून पडले. यात दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. सुदैवाने काही विपरीत घटना घडली नाही. तसेच एका घरावरील पाण्याची टाकीही जोरदार वाऱ्याने कोसळली. मुखेकर वस्ती परिसरात पावसाचा जोर अधिक होता.
आज दुपारपर्यंत पाऊस पडेल असे वाटतही नव्हते. ढाकी वस्तीवर ओढ्यानजीक असलेल्या विहिरीत पाण्यासाठी आडवे बोअर घेण्याचे काम सुरु होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वादळी पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या प्रचंड तुफानी पावसाने नजीकच्या ओढ्यास पूर आला आणि पुराचे पाणी थेट विहिरीत शिरले. विहीर तुडुंब भरली, पण आडवे बोअरचे साहित्य मशीनसह पाण्यात बुडाल्याचे नितीन मुखेकर, दत्ता नानाभाऊ सांडभोर यांनी सांगितले, पण पहिलाच पाऊस तेही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असले, तरी गावाच्या पूर्वेकडील येडे बोराडे वस्ती, धागे माथा, रोहिलेवाडी पवार वस्ती व परिसरास पावसाने हुलकावणी दिल्यास शेतकरी विलास रोहिले, रंगनाथ, अनिल येडे यांनी सांगितले, मात्र पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.





























































