
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करण्यासाठी मुस्लिम समाजाने सोलापुरात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर विजापूर वेस येथून सिद्धेश्वर प्रशालामार्गे पुनगेट येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मुस्लिम युवक सहभागी झाले होते. या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अनुदार उद्गार काढणाऱया भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांचा तीक्र निषेध व्यक्त करीत भाजपविरुद्ध आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. या प्रचंड मोर्चामुळे मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवीन जिंदाल व नूपुर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी; अन्यथा मुस्लिम समाज यापुढे तीक्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकाऱयांना निवेदनही देण्यात आले. यावेळी तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, रेश्मा मुल्ला, फारूख शाब्दी यांच्यासह विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
नगर शहरातील मुस्लिम समाजाची दुकाने बंद
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱया भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने नगर शहर व परिसरातील दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. शहरातील आलमगीर, मुकुंदनगर, गोविंदपुरा, सर्जेपुरा, पिंजार गल्ली, घास गल्ली, मोची गल्ली, पंचपीर चावडी, हातमपुरा, गंजबाजार, जुना बाजार, नालबंद खुंट यांसह भिंगार परिसरातील मुस्लिम समाजाची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, कर्जत आणि जामखेड बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला.


























































