
जीवनात आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने एक तरी छंद जोपासला पाहिजे. मग तो छंद कुठलाही का असेना. सांताक्रुझ येथे राहणारे रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर हे सध्या आपल्या आगळय़ावेगळय़ा छंदामुळे चर्चेत आले आहेत. ते चक्क शिट्टीवर सुरेल गाणी सादर करतात. सोशल मीडियावरील त्यांच्या व्हिडीओला खूप पसंती मिळतेय.
रुपेश मुरुडकर यांना लहानपणापासून शिट्टी वाजवण्याची आवड. पुढे त्यांच्या याच आवडीचे छंदात रूपांतर झाले. आजवर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट गीते, अभंग, भजने, देशभक्तिपर गाणी, गुजराती गरबा अशी शेकडो गाणी शिट्टीवर सादर केली आहेत. विविध कार्यक्रम आणि सोशल मीडियाद्वारे रुपेश यांची कला सर्वांपर्यंत पोहोचतेय. ‘व्हिस्टलर रुपेश मुरुडकर’ या त्यांच्या यूटय़ूब चॅनेलवरील शिट्टीवरील सुरेल गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आपल्या छंदाविषयी रुपेश मुरुडकर सांगतात, मला ही कला माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे वडील शेतकरी असल्यामुळे शेतात नांगर धरताना विरंगुळा म्हणून शिट्टीवर गाणी सादर करायचे. त्यांना पाहून मलाही शिट्टीवर गाणी सादर करण्याची आवड निर्माण झाली. पुढे ते म्हणाले, आपल्या समाजात शिट्टी वाजवणे असभ्य, टपोरी वर्तन समजले जाते. परंतु तुमची शिट्टीवरील सुरेल गाणी ऐकताना कुठेही असभ्यपणा जाणवत नाही, अशा प्रतिक्रिया लोकांकडून मिळतात तेव्हा खूप समाधान मिळते. गायक जसे आलाप घेतात तशी नकळत माझ्या तोंडातून शिट्टय़ांची ताण येते, असे ते म्हणाले.
भविष्यात प्रत्येक देशातील लोकप्रिय गाणी शिट्टय़ांवर सादर करण्याची आपली इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या या छंदाची दखल ‘सह्याद्री’ वाहिनीवरील विचारांच्या पलीकडे या कार्यक्रमात घेण्यात आली आहे. शनिवार, 16 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता आणि रात्री 10 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.



























































