
एसटी महामंडळाने दिवाळी निमित्त आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ 1494 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 21 ते 31 आॅक्टोबर, 2022 दरम्यान या गाड्या धावणार आहेत.
मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्याने 29 सप्टेंबर 2022 रोजी सर्व विभागांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन 1494 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या संभाजीनगर येथून 368, मुंबई 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274 व अमरावती येथून 71 गाड्या सोडण्यात येतील, असे चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा….
एसटीने 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ मोफत प्रवास योजना लागू केली आहे. तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून 50 टक्के सवलत दिली आहे.



























































