
>> महेंद्र पाटील
बघता बघता यंदाचाही पाऊस निघून गेला. जाता जाता काही नव्या आठवणी देऊन गेला. पाऊस गेला, हुरहुर गेली. श्रावण ओलेती चाहूल गेली. आता पुन्हा तप्त उन्हाळ्यांची याद मला आली. आता मुक्या वेदनांची साद मला आली. हा असा असतो पाऊस. पाषणालाही हिरवे काव्यांकुर फुटावेत, आर्त भावनांचे कल्लोळ मनी उठावेत असाच असतो हा पाऊस. ऋतू एक असला तरी त्याचे रंग अनेक आहेत. अवेळीच कधी येणारा वळवाचा पाऊस, ज्याची आपण वाट पाहतो तो मृगाचा हळवासा पाऊस, आषाढाच्या अथांग धारांचा कोसळता पाऊस, श्रावणाच्या सरींचा रिमझिमता पाऊस, ढगांच्या कडकडाटांचा, विजेच्या कडकडाटांचा काहीसा घाबरवून सोडणारा हा परतीचा पाऊस…हा असतो पाऊस. यंदा वेळेवर त्याने परतीचा रस्ता धरला आणि त्या परतीच्या पावसासोबत मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मला भेटायला आलेल्या तुझ्या आठवणीसुद्धा सोबत घेऊन गेला.
मी माझ्या मनातला पावसाळी आठवणींचा एकेक कप्पा बंद करू लागलो. आठवणीसुद्धा माहेरवाशिणीसारख्या डोळ्यात पाणी आणून घरी परतू लागल्या. खरं तर त्यांना घरी जायची इच्छा नव्हती, पण मीच त्यांना समजवलं, ऋतू बदललाय, आता तुम्हाला जायलाच हवं. तुम्ही जर इथे थांबलात तर नव्या ऋतूच्या आठवणी जेव्हा येतील तेव्हा उगाच मनात दोन्ही ऋतूंच्या आठवणींची गर्दी नकोच.कारण आठवणींना पण हेवेदावे असतात, आपल्या मनासारखे. उगाच माझ्या मनातील आठवणींनी एकमेकांशी भांडायला सुरुवात केली तर बुद्धी नकळत मनाचा ताबा घेईल आणि बुद्धीने ताबा घेतल्यावर माझ्या मनात नव्या ऋतूंच्या नव्या हळव्या कविता कशा जन्माला येणार? कारण बुद्धीला फक्त व्याकरण कळतं आणि मनाला भावना. खरी कविता मनच लिहू शकतं.
या पावसात गेल्या अनेक ऋतूंच्या आठवणींचा जमाखर्च माझ्या मनाने लिहून काढला. खूप काही नवे क्षण, नव्या आठवणी यंदाचा पाऊस देऊन गेला. त्यातल्या काही आठवणींनी घरी परतू नये असं मलाही मनातून लाख वाटत असलं तरी निसर्ग नियमाप्रमाणे ऋतू बदलल्यावर इच्छा नसतानाही त्यांना निरोप द्यावा लागतो. तसा निरोप मी माझ्या प्रत्येक आठवणीला दिला. शरदाचं टिपूर चांदणं पडू लागलं, मी माझ्या सर्व पावसाळी आठवणीतून बाहेर पडलो आणि अचानक एका दुपारी अवेळी अंधार दाटून आला. एक वीज कडाडून गेली. आकाशात पुन्हा ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता तो कोसळू लागला, प्रचंड! त्याचे सगळे रंग एकवटून तो बरसत होता जणू. माझ्या मनात पुन्हा पावसाळी आठवणींनी गर्दी केली. पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तोच तुझ्या अंतरीचा श्रावण, पुन्हा आठवणी भिजल्या, पुन्हा एकदा माझं मन पावसाळी कविता करू लागलं. खूप कठीण असतं हे नव्या ऋतूमध्ये मन रमल्यावर जुना ऋतू परतून यावा, पुन्हा तुझ्या आठवणी नव्याने माझ्या समोर याव्यात आणि पुन्हा माझं मन तुझ्या आठवांनी ओलंचिंब व्हावं…असा असतो हा पाऊस.
आता पुन्हा परतून आल्यावर मनाला याचा लळा लागतो आणि त्याची ती सुखद चाहूल अनुभवताना मन पुन्हा रममाण होतं. आता याचं हे बरसणं कुठल्याही क्षणी थांबेल अशी हुरहुर निर्माण झाली आहे. मनात दोन ऋतूंच्या आठवणींची अबोल आंदोलने सुरू झाली आहेत. तरीसुद्धा का कुणास ठाऊक, माझं मन पावसाला एक आर्त साद घालू पाहतं, थांब ना रे पावसा! मी खिडकीत बसून हातात कागद आणि पेन घेऊन काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय, खिडकीतून पाहतोय मी हा बाहेरचा पाऊस. ऋतू बदलून गेला तरी याला कोसळण्याची हौस!





























































