
बनावट पासपोर्ट तयार करून लंडन येथे जाणाऱया दोघांना सहार पोलिसांनी अटक केली. देवा लीला आडेदरा आणि कांधल आजा मोधवाडिया अशी त्या दोघांची नावे आहेत. बनावट पासपोर्ट करण्यासाठी त्या दोघांनी एका एजंटला 20 लाख रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे.
मूळचे गुजरातचे रहिवासी असलेले देवा आणि कांधल हे गेल्या आठवडय़ात लंडनला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱयाने त्या दोघांच्या पासपोर्टची तपासणी केली. इमिग्रेशन अधिकाऱयाने त्या दोघांना वय विचारले तेव्हा त्याने वय चुकीचे सांगितले. तसेच त्यांना पत्ता विचारला असता त्याने ठाण्यातील पत्ता सांगितला. ठाणे परिसराची माहिती विचारली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्याच्या भाषेवरून ते गुजरातचे रहिवासी असल्याचे उघड झाले.
इमिग्रेशन अधिकाऱयाने त्या दोघांना ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. देवा आणि कांधल या दोघांना लंडनला कायमचे राहण्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्याने एका एजंटची मदत घेतली. लंडनला पाठवण्यासाठी एजंटने 20 लाख रुपये घेतले होते.


























































