
महिला वकिलांनी न्यायालयात केस बांधू नयेत, असे आदेश देणारी नोटीस पुण्यातील जिल्हा न्यायालयाने लावली आहे. या नोटिशीची नेटकऱ्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली आहे.
पुण्यातील जिल्हा न्यायालयाने 23 ऑक्टोबर रोजी ही नोटीस जारी केली आहे. या नोटिसीनुसार, येथील महिला वकील आपले केस न्यायालयात बांधतात असं वारंवार निदर्शनाला आलं आहे. त्यांच्या अशा कृत्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांनी न्यायालयात आपले केस बांधू नयेत, असं या नोटिसीत नमूद करण्यात आलं आहे.
या नोटिसीचा फोटो ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी शेअर केला आहे. महिला वकिलांमुळे कोणाचं आणि कशासाठी लक्ष विचलित होतंय ते पाहा, अशी कॅप्शनही त्यांनी या फोटोखाली दिली आहे.
Wow now look ! Who is distracted by women advocates and why ! pic.twitter.com/XTT4iIcCbx
— Indira Jaising (@IJaising) October 23, 2022
नेटकऱ्यांनीही या नोटिशीची खिल्ली उडवली आहे. ही नोटीस अतिशय विचित्र असून यातून दिसणारी पितृसत्ताक मनोवृत्ती अतिशय हास्यास्पद आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तसंच, ही नोटीस अतिशय हास्यास्पद असून केस बांधल्याने न्यायालयीन कामकाजात कसा काय अडथळा येणार हे समजत नसल्याचंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या खिल्लीनंतर न्यायालयाने ही नोटीस मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.




























































