शिर्डी येथे साईबाबा मंदिरात दीपोत्सव साजरा, खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त मंत्रोपचाराचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार दीपावली सणानिमित्त श्रीलक्ष्‍मीपूजन उत्‍सव उत्साहात साजरा करण्‍यात आला. श्री साईबाबांच्‍या समाधी मंदिरात संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत आणि त्‍यांचे पती संजय धिवरे, सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नाशिक यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी-कुबेर पूजन करण्‍यात आले.

परंपरेनुसार, दीपावली श्रीलक्ष्‍मीपूजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला. सायंकाळी 5:00 ते 6:00 या वेळेत समाधी मंदिराच्‍या गाभाऱ्यात संस्‍थानच्‍या वतीने पूजना कार्यक्रम यथासांग पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्‍मी-कूबेर पूजन, सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे इत्यादी कार्यक्रम झाले. तसेच यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रींच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

या उत्सवानिमित्त कानपूर येथील साईभक्‍त श्रीमती कविता कोटवाणी कपूर व शनि शिंगणापूर येथील गणेश शेटे, शनेश्‍वर डेकोरेर्टस यांच्‍या वतीने देणगी स्‍वरुपात विद्युत रोषणाई व बेंगलोर येथील देणगीदार साईभक्‍त श्री. आर. पंचपाकेसन यांच्‍या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

साईबाबांची शिर्डीही दिव्यांनी उजळली

अनेक वर्षांपूर्वी साईबाबांनी तेल न मिळाल्याने पाण्याने दिवे लावले होते, अशी कथा सांगितली जाते. या प्रसंगाचे औचित्त्य साधून आजही द्वारकामाईसमोर 11 हजार दिवे लावून साईभक्तांसह ग्रामस्थांनी दीपोत्सव साजरा केला. त्यामुळे साईबाबांची शिर्डीही दिव्यांनी उजळून निघालीय. ‘दीपावली मनाये सुहानी… मेरे बाबाके हाथोमे जादू का पानी…’, असे म्हणत देशभरातून आलेले हजारो भाविक मंदिर परिसरात दिव्यांचा झगमगाट करून साईबाबांनी सुरू केलेली ही प्रथा आजही जोपासतात. या पारंपरिक सणानिमितित्त तीन दिवस दीपोत्सव साजरा केला जातो. शिर्डीसह देशभरातून आलेले साई भक्त साई मंदिर परिसर दिव्यांनी उजळून टाकत असल्याचं चित्र येथे या दिवसांत पाहायला मिळतं.

खंडग्रास सूर्यग्रहण

ग्रहण सुरू होताच शिर्डीच्या साई मंदिरात मुख्य दर्शन रांग बंद करण्यात आली होती. खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) काळात दुपारी 04:50 वाजता साईबाबा समाधी मंदिरात श्रींच्‍या समोर मंत्रोपचार करण्‍यात आले. साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्र ठेवून मंत्रोचाराला प्रारंभ झाला. पुढील 2 तास हा मंत्रोचार सुरूच होता. मंत्रोपचार संपल्‍यानंतर सायंकाळी06:40 वा. श्रींचे मंगलस्‍नान झाले. त्‍यानंतर सायंकाळी 06:55 वाजता श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती होऊन सायंकाळी 07:15वाजता श्रींची धुपारती झाली. आरती झाल्यानंतर मुख्य दर्शन रांग सुरू करण्यात आली.