
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला बोलाविण्यात आले आहे. शिवसेनेने याचा निषेध केला असून, राज्यपालांना कोल्हापुरात पाय ठेवण्यास तीव्र विरोध केला आहे. येत्या शनिवारी जेलभरो आंदोलन करण्याचा आज इशारा देण्यात आला आहे. तरीसुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यास दीक्षान्त समारंभाच्या दिवशी काळ्या फिती लावून निदर्शने करण्याचा इशाराही देण्यात आला.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, रविकिरण इंगवले, मंजित माने, चंद्रकांत पाटील, लतिफ शेख, कमलाकर जगदाळे, पूनम फडतरे, राजेंद्र पाटील, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू जाधव, विनोद खोत, विशाल देवकुळे, राजू यादव, संतोष रेडेकर, अभिजित बुकशेट, प्रशांत भोसले आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ 16 फेब्रुवारी रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱया राज्यपालांना आमंत्रित करून राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम विद्यापीठाने करू नये. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यांतील पदवी घेणाऱया विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱया राज्यपालांच्या हातून पदवी स्वीकारू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जनतेच्या भावना राज्यपाल कार्यालयाला पोहोचवा, तसेच राज्याच्या जनतेची माफी मागितल्याशिवाय राज्यपालांना कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






























































