केंद्र सरकारच्या समितीने मणिपूरमध्ये शांततेसाठी प्रयत्न का केले नाहीत? काँग्रेसचा सत्ताधारी भाजपला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवारी मणिपूर येथे पुन्हा हिंसाचार उफाळला आणि त्यात 13 जणांचा मृत्यू झाला. यावरून टीका करताना काँग्रेसने सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सात महिने होऊनही मणिपूर अशांतच असून केंद्राने स्थापन केलेल्या समितीने मणिपुरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काहीच प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट लिहून टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये खरगे म्हणाले की, मणिपूर गेले सात महिने जळतंय हे खरोखर अक्षम्य आहे. गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 215 दिवसांत साठ हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत आणि शरणार्थी शिबिरात राहत आहेत. त्या शिबिरांची स्थितीही फारशी चांगली नाही, अशी टीका करतना खरगे यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.

ते म्हणतात की, या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडण्यासाठी कोण जबाबदार आहे? मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह हे पदावर कायम राहण्यासाठी कोण जबाबदार आहे? मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि जीवनमान सुरळीत होण्यासाठी जी समिती स्थापन केली होती, त्या समितीने प्रत्यक्ष कार्य का केलं नाही?, अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपलं मौन सोडून मणिपूरविषयी बोलायला हवं, जेणेकरून ईशान्येकडील या राज्यातील हिंसाचारावर असा एखादा मार्ग शोधता येईल जो सर्व पक्षांना मान्य असेल, असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.