
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त शेगाव येथे श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर वार रविवार 31 डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगांवात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने रविवार 31 डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री येणार्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नविन वर्षाची सुरुवात करणार आहे. श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. तरी सर्व श्रींच्या भक्तांनी नोंद घ्यावी. भाविकांची वाढती गर्दी पाहाता, गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संस्थानने निर्णय घेतला. दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाला करत असतात सुरुवात. यामुळे 31 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भाविक शेगांवात दाखल होतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.



























































