काँग्रेस आमच्या रक्तात! ही विलासरावांची शिकवण – अमित देशमुख यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस आमच्या रक्तात आहे. ही विलासराव देशमुख यांचीच शिकवण असल्याने मी सुद्धा माध्यमांना मी जिथे आहे तिथे ठीक आहे असे सांगितले असे म्हणत आमदार अमित देशमुख यांनी आज काँग्रेस पक्ष सोडण्याबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. लातूर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व ‘विलास भवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मोघे, वैशाली विलासराव देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, आमदार धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास दादा पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर, अभिजित वंजारी, सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, ट्वेन्टी वन अ‍ॅग्रो लि.च्या संचालिका अदिती अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमित देशमुख पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं तर निष्ठा काय असते हे आपल्याला लक्षात येईल. निष्ठेने समाजाचं काम करणं, राजकारण करणं, पक्षाचं काम करणं हे सारं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. मध्यंतरी काही प्रसंगांत त्यांच्यावर कारवाईही झाली. मात्र त्या काळातही त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, मला काँग्रेसमधून काढाल पण माझ्या रक्तातली काँग्रेस कशी काढणार? विलासराव देशमुख यांचं हे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीतही लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्याबद्दलही लोकांनी अनेक चर्चा केल्या. पण मी लोकांना, माध्यमांना मी जिथे आहे तिथे ठीक आहे असे सांगितल्याचे ते म्हणाले.

आज विलासराव असायला हवे होते- पृथ्वीराज चव्हाण
यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज महाराष्ट्राला काँग्रेस पक्षाला विलासराव देशमुख यांची गरज होती. आजची परिस्थिती लक्षात घेता त्यांची जुनी भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या भाषणातून एक प्रेरणा आम्हाला नक्कीच मिळते पण आज ते आपल्यात नाहीत ते आज आपल्यात असायला हवे होते परिस्थिती नक्कीच वेगळी असली असती असेही ते म्हणाले.

युवकांनी विलासरावांची प्रेरणा घ्यावी – पटोले
विरोधी पक्षाची फोडाफोडी करुन लोकशाही कमकूवत करण्याचे काम भाजपाकडून होत आहे.अलीकडेच काँग्रेसमध्ये अशी एक फुट पडली आहे.परंतू गटातटाच्या राजकारणातील एक तट बाजूला गेल्यामूळे आता काँग्रेस अधिक मजबूत झाली आहे.‘काँग्रेस संपवणारे संपतील पण काँग्रेस कधी संपली नाही’ असे आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी सांगत असत.पक्षातील नवतरूणांनी आपल्या नेत्याचे आदर्श समोर ठेऊन आज पासून कामाला लागावे. जेणे करून राज्यात पून्हा काँग्रेस सत्तारूढ झालेली आपल्याला पाहयला मिळेल असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

सुसंस्कृतपणा लोप पावत आहे-जयंत पाटील
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले की, तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक पडला आहे. सध्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात प्रत्येक जण आपली भूमिका आपल्या परीने बजावत आहेत एकमेकांना शिवीगाळ, धमक्या असे प्रकार आजच्या राजकारणात आपण पाहत आहोत. थोर राजकीय व्यक्तीची महाराष्ट्रात रुजवलेली संस्कृती दुर्दैवाने आज लोप पावत असल्याचे सांगत विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळ काळात आलेले अनुभव आणि आठवणीना त्यांनी उजाळा दिला.

काका-पुतण्याचं नातं प्रेमाचं असलं पाहीजे- रितेश देशमुख
विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून एकमेकांना जपलं. या दोन भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो, हाच संदेश विलासराव आणि दिलीपराव यांनी दिला. आज विलासराव यांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली. पण आम्हाला वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमीच आमच्या मागे उभे राहिले. दिलीपराव काकांना अनेकदा बोलता आलं नाही. पण मी आज सर्वांसमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहीजे, याचे ज्वलंत उदाहरण आज इथे तुमच्यासमोर आहे’, असेही रितेश देशमुख म्हणाले. यावेळी दिलीपराव देशमुख, उल्हास दादा पवार, सतेज पाटील विश्वजित कदम यांचीही भाषणे झाली.