
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबागडावर आज माघी पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या शिखरी काठय़ा खंडोबाला भेटल्या. ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱयाची मुक्त उधळण केल्याने गडाचा सर्व परिसर सोनेरी झाला.
जेजुरीत माघी पौर्णिमा यात्रा तीन दिवस चालते. पौर्णिमेच्या दुसऱया दिवशी शिखरी काठय़ांच्या भेटीचा सोहळा गडावर असतो. त्याप्रमाणे आज संगमनेर येथून आलेली होलम राजाची शिखरी काठी, सुपे येथून आलेली खैरे यांची काठी व जेजुरीच्या होळकरांची काठी या मानाच्या काठय़ा खंडोबाला दुपारी भेटल्या. यावेळी खंडोबागडावर मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, पोपट खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, सतीश घाडगे, गणेश डिखळे आदी उपस्थित होते.
सुमारे 200 वर्षांपासून संगमनेरचे होलम राजा व सुप्याचे खैरे यांच्यामध्ये काठी टेकविण्याच्या मानपानावरून अनेक वेळा मोठा वाद झाला होता. त्यामुळे 15 वर्षांपूर्वी पोलीस प्रशासनाने वाद टाळण्यासाठी दोघांनी स्वतंत्रपणे काठय़ा गडावर नेऊन भेटवाव्यात, असा नियम केला. त्याप्रमाणे आज दुपारी साडेबारा वाजता सुपे येथील मानाची खैरे काठी व जेजुरीतील होळकरांची काठी खंडोबाला भेटविण्यात आली. दुपारी एक वाजता चिंचेच्या बागेतून संगमनेर येथील मानाची होलम राजाची काठी वाजतगाजत खंडोबागडावर देवाला भेटण्यासाठी निघाली.
होळकरांचे छत्री मंदिर, गावातील हनुमान मंदिर येथे भेटून साडेतीन वाजता मुख्य होलम राजा व इतर मानाच्या प्रासादिक काठय़ांनी खंडोबागडावर प्रवेश केला. ढोल-ताशांच्या गजरात ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत काठय़ा खंडोबा मंदिराला टेकविण्यात आल्या. यावेळी गडावर हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वजण आनंदाने नाचत होते.
होलम राजाच्या मानाच्या काठीला आगळ कांडे व रेशमी गोंडे, पाच रंगांचे कपडे व चांदीचा पटका असतो, तर खैरे यांच्या काठीला दोन रंगांचे कपडे व बाण असतो. खंडोबा देवस्थानतर्फे होलम राजा देवस्थानचे तुकाराम काठे, भिकाजी गुंजाळ, दिलीप गुंजाळ, गोविंद भरीतकर, संभाजी तनपुरे व सुपे येथील खैरे काठीचे मानकरी शहाजी खैरे, शरद खैरे, देवीदास भुजबळ, भगवान खैरे यांचा सन्मान केला.
चांदीच्या पालख्यांच्या मिरवणुका
n माघी पौर्णिमा यात्रेसाठी मुंबई परिसरातून कोळी बांधव मोठय़ा संख्येने आले होते. त्यांनी आणलेल्या चांदीच्या पालख्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. होळकरांच्या ऐतिहासिक चिंचेच्या बागेत तात्पुरते भव्य खंडोबा मंदिर उभारून तेथे देखावा तयार केला होता.





























































