
‘हिंदूंनी हिंदूंसाठीच व्यवसाय करावा. हिंदूंनी अहिंदूंकडून काही खरेदी करू नये. त्यांच्या सेवा घेऊ नयेत. उर्मट असला तरी चालेल पण घरात प्लंबर, वायरमन आणि कारपेंटर हिंदूच बोलवा,’ असे वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.सांगली येथे हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीने आयोजित गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पोंक्षे बोलत होते. ‘हिंदू व्यक्तींनी आपल्या घरात सेवा देणारा कारपेंटर, प्लंबर, वायरमन हिंदूच असेल हे पाहावे. तो कितीही उर्मट असला, तो उशिरा आला, आज येतो सांगून चार दिवसांनी आला तरी चालेल, पण तो हिंदूच असेल हे पाहा. धर्मांतरण होण्यापेक्षा चार दिवस त्याची वाट पाहणं कधीही चांगलं,’ असे ते म्हणाले.
हिंदू जागा होत नसल्याचा हा परिणाम
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे सध्या वाद सुरू आहे. त्यावर पोंक्षे यांनी यावेळी भाष्य केले. ‘हिंदू जागाच होत नसल्याचा हा परिणाम आहे,’ असे पोंक्षे म्हणाले.
भाज्या महाग झाल्या तरी चालतील, धर्म महत्त्वाचा!
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि महागाईवरून सध्याच्या सरकारवर होणाऱया टीकेच्या अनुषंगानेही पोंक्षे यांनी मत मांडले. ‘पेट्रोल उद्या 200 रुपयांवर गेलं, डिझेल 300 रुपयांवर गेलं, तर मी एकवेळ चालत जाईन… पण हिंदू म्हणून चालत जाईल. पेट्रोल-डिझेल 10 रुपयांत किंवा फुकटात मिळत असेल, पण त्यासाठी मला धर्म बदलावा लागत असेल तर ते जमणार नाही, असे ते म्हणाले. भाज्या महाग झाल्या तरी चालतील, एकवेळ जेवण करून राहीन, एकाच कपडय़ात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल,’ असेही पोंक्षे म्हणाले.
























































