विद्यार्थ्यांवरील लाठीमार, चंदाचोरीवरून संसद ठप्पच; कामकाज दिवसभरासाठी तहकूब, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याबाबतचे विधेयक मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला निर्दयी लाठीमार व अयोध्येच्या राममंदिरातील दानपेटीवर भाजपा समर्थक मंडळींनी मारलेला डल्ला, या मुद्दय़ावरून आजही विरोधकांनी जोरदार आवाज उठविला. त्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प पडले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची शिफारस करणारे विधेयक, या गदारोळातच मंजूर करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच नेहमीप्रमाणे गदारोळाला सुरुवात झाली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा त्यानंतर दुपारी दोन त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही गदारोळ कायम राहिला. फक्त फरक इतकाच की राज्यसभेचे कामकाज लगेचच गुंडाळले गेले नाही. काही आवश्यक कामकाज आटोपण्यात आले.

विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी, भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केले. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक, लोकसभेत मंजूर करण्यात आले.

राज्यसभेतही  गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केले.

देणगी चोरीवरून आंदोलन

संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी देणगी चोरीवरुन निदर्शने केली. समोर एक दानपेटी ठेवण्यात आली. त्यात विरोधी पक्षांच्या खासदारांनी एका पाठोपाठ येत दान टाकले. यावेळी खासदारांच्या हातात भाजपविरोधी घोषणा असलेले फलकदेखील होते. ‘हर ओर बस एक ही शोर, ये भाजपाई हे चंदा चोर’ यासारख्या घोषणा त्यावर लिहिल्या होत्या.