
संकटाच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या आपत्ती प्रतिसाद दलातील (टीडीआरएफ) जवानाचा खड्ड्याने बळी घेतला. सोमवारी सकाळी शहापूरहून ठाण्याला येताना विकास गोरे (३०) यांची मोटारसायकल खड्यात आदळली. यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झाला. नाशिक-मुंबई महामार्गावरील कळंभे गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील बामणे येथे राहणारे विकास गोरे हे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील धाडसी जवान म्हणून परिचित होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विकास गोरे हे बुलेटवरून येत असताना कळंभे परिसरातील महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्यात त्यांची दुचाकी आदळली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील कोहिनूर इमारतीच्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या जवानांमध्ये त्यांचा समावेश होता. पूर, इमारत दुर्घटना आणि विविध आपत्तीच्या वेळी जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या या जवानाचा एका खड्यामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी गोरे यांच्या नातेवाईकांनी केली. अखेर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी विकास यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
बळी गेल्यावर प्रशासन जागे
ज्या खड्याने विकास गोरे यांचा जीव घेतला तोच खड्डा अपघातानंतर तातडीने बुजविण्यात आला. विशेष म्हणजे अपघात झालेला तेवढाच खड्डा बुजविला आहे. त्या पुढे व मागे असणारे खड्डे मात्र बुजविले नसल्याने प्राधिकरण आणखी अपघात घडण्याची वाट पाहणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश
शहापूर तालुक्यातील बामणे येथे राहणारे विकास गोरे यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन जुळ्या मुली असा परिवार आहे. अपघातात पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नी कविता यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटणारा होता. माझ्या पतीचा बळी खड्याने घेतला, आता मी मुलींना कसे सांभाळू, असा टाहो त्यांनी फोडला. मुलीची तब्येत बरी नसल्याने सायंकाळी 4 कामावरून आल्यावर दवाखान्याला जाऊ, असे सांगून विकास घराबाहेर पडले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचीच बातमी आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
ठाणे-भिवंडी रोडवर मृत्यूने ‘आ’ वासला
ठाणे ही स्मार्ट सिटी असल्याचे ढोसताशे महानगरपालिका नेहमी बडवत असते. पण ऐन पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले असून सर्वसामान्य वाहनचालक व प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. ठाणे-भिवंडी मार्गावरील कशेळी ब्रिज व टोलनाक्यावर खड्यांचे जाळेच निर्माण झाले आहे. हे खड्डे चुकवत चालकांना रोज कसरत करावी लागत असून आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ठाणे-भिवंडी रोडवर मृत्यूने ‘आ’ वासला असतानाही स्मार्ट सिटीचे तुणतुणे सुरूच आहे.
ठाण्यात २४ निष्पापांचा वर्षभरात खड्ड्यांनी घेतला जीव; भिवंडी, नाशिक, घोडबंदर महामार्ग डेंजरझोन
पतीसोबत दुचाकीवरून जाताना ठाण्यातील सुनीता पाल यांचा भिवंडी येथील खड्यात पडून मृत्यू झाला. त्यानंतर २४ तासातच विकास गोरे या टीडीआरएफ जवानाचा खड्ड्यामुळे बळी गेला आहे. रस्त्यावरील खड्कुधांमुळे ठाणे जिल्ह्यात वर्षभरात जवळपास २४ निष्याप प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः पावसाळ्यात ठाणे-भिवंडी, मुंबई-नाशिक महामार्ग, आणि घोडबंदर रोड हे मार्ग वाहनचाल कांसाठी अत्यंत जीवघेणे ठरत आहेत.
ठाणे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांनी वर काढलेले डोके आणि निष्काळजीपणामुळे अनेक वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खड्यांमुळे दुचाकी घसरणे, पाठीमागून येणाऱ्या अवजड वाहनांखाली चिरडण्यासारख्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, खराब रस्ते बनवणाऱ्या दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई करून प्रशासनाने खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.






























































