
बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी झाले. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची ती सीट होती. गेली 25 वर्षे भाजप तिथे जिंकत आली आहे. बिहारमध्ये बदल होतोय. ही देशात बदल होण्याची चिन्हे आहेत. बदलाचे हे वारे देशभरात घुमतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी आज ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण’ला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. ‘वरळी मतदारसंघात अनेक गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागले आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात सुरू केला होता. पोलिसांच्या घरांसाठी प्रयत्न केले. रखडलेल्या एसआरएच्या अनेक योजना शिवसेनेने मार्गी लावल्या. आता वल्लभभाई पटेलनगर आणि आजूबाजूच्या भागाचा विकास बाकी आहे. त्याबाबत जाणून घेण्यासाठी आपण एसआरएमध्ये आलो होतो,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गडकरीच नव्हे, मोदींबद्दलही देशात रोष
इथेनॉल घोटाळ्यावरून नितीन गडकरी यांच्याबद्दल रोष आहे, असे पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर, गडकरीच नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या विरोधातही देशात रोष आहे, असे ते म्हणाले. गेल्या 12 वर्षांत आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातही घोळ झालेले आहेत. भाजपला सरकार चालवता येत नाही. भाजपच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झालेत, त्यातून त्यांचे अपयश दिसले. इथेनॉलमुळे कितीतरी जणांच्या गाडय़ा खराब झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाला दरवर्षी डिसेंबरची डेडलाईन दिली जाते, परंतु अद्याप तो पूर्ण झालेला नाही, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
हिंदूविरोधी भाजप सर्वत्र दिसतोय
वाराणसीत पंतप्रधान मोदींचे मताधिक्य घटले होते. कारण कॉरिडॉरच्या नावाने त्यांनी जुनी मंदिरे तोडली, पुजाऱयांची घरे तोडली, स्टोन कटरने मूर्ती कापल्या गेल्या ते सर्वांनी पाहिले. फक्त राजकारणासाठी अयोध्येत राम मंदिर अपूर्ण असताना सुरू केले गेले. त्याच मंदिरातून देणगी चोरी झाली. भाजपची ही हिंदूविरोधी बाब आहे ती सगळीकडे दिसते, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी जेन-झींसोबत संवाद साधणार आहेत. पण हाच संवाद विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यापूर्वी, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यापूर्वी, माफी मागायला लावण्यापूर्वी का केला नाही? हा संवाद साधण्यास आता फार उशिरा होत आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन संविधानविरोधी होते, असे संघाचे नेते म्हणतात. कारण भाजपला स्वतःचे संविधान देशावर लादायचे आहे, म्हणूनच त्यांना दोन तृतीयांश बहुमत हवे आहे. मतदारसंघ पुनर्रचना हा केवळ बहाणा आहे. जनतेला मिळालेले जे हक्क आहेत ते भाजपला काढून घ्यायचे आहेत.






























































