‘मालवण’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली ‘मालवण’ युद्धनौका हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. ही युद्धनौका पाण्याखाली पाळत ठेवणे, पाणबुडीविरोधी युद्धमोहिमा राबवणे, कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया आणि सुरुंग युद्धक्षमता यासाठी सुसज्ज आहे. शत्रूच्या पाणबुडय़ांचा शोध घेणे आणि त्यांना निष्क्रिय करण्यात सक्षम असलेल्या ‘मालवण’मुळे आता नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनांना चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जाते. नौदलाला अशा आठ अँटी सबमरीन युद्धनौका मिळणार आहेत. त्यातील ‘मालवण’ ही दुसरी युद्धनौका मंगळवारी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. सुमारे 80 मीटर लांबी आणि 1,100 टन विस्थापन क्षमता असलेल्या या युद्धनौकेवर टॉर्पेडो, बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत रडार व सोनार प्रणालींसह अत्याधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असलेली ‘मालवण’ ही युद्धनौका स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. ही युद्धनौका अशी उपकरणे वाहून नेते, ज्यांची निर्मिती आणि एकत्रीकरण देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योगांनी केले आहे, यामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा समावेश आहे.

छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा वारसा

‘मालवण’ हे नाव महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील ऐतिहासिक शहर असलेल्या ‘मालवण’वरून घेण्यात आले आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली सागरी वारश्याशी जोडलेला आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या ‘आयएनएस मालवण’ या हिंदुस्थानी नौदलाच्या सुरुंग नाशक जहाजाचा वारसादेखील पुढे चालवते. हे जुने जहाज 2003 पर्यंत सेवेत होते. अशा प्रकारे प्रतिष्ठत युद्धनौकांची नावे जतन करण्याची नौदलाची परंपरा या जहाजाद्वारे अखंडपणे सुरू ठेवली गेली आहे.