
तुर्कस्तानच्या सानलिउर्फा प्रांतात माजी विद्यार्थ्याने शाळेत अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात 10 विद्यार्थ्यांसह चार शिक्षक, एक कॅन्टीन कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. शाळेत गोळीबार केल्यानंतर माजी विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सानलिउर्फा प्रांतातील सिवेरेक येथील एका शाळेत ही घटना घडली. गोळीबार करणारा विद्यार्थी 18 वर्षांचा असून त्याच्याकडे शॉटगन होती. गोळीबार केल्यानंतर तो इमारतीत लपून बसला. नंतर त्याने त्याच शॉटगनने स्वतःवर गोळी झाडून घेतली, असे राज्यपाल हसन सिल्डक यांनी सांगितले. जखमींवर सिवेरेकमध्ये उपचार सुरू आहेत, मात्र पाच जणांना प्रांतीय राजधानीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जखमी शिक्षकांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. हल्लेखोराने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने पोलिसांची विशेष कृती पथके तैनात करण्यात आली. शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
























































