गोरेगाव येथील लाईव्ह कॉन्सर्टमधील मृत्यू प्रकरण, वनराई पोलिसांकडून सहा जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) आणि एनडीपीएस कायद्याच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. पोलीस संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा शोध घेत आहेत.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या आरोपींमध्ये कार्यक्रमाचा आयोजक विहान उर्फ आकाश सामल, सनी विनोद जैन आणि सुरक्षा कर्मचारी बालकृष्णन बलराम यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जबाबांच्या आधारे पोलीस ड्रग्ज नेटवर्कचा तपास करत आहेत.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये 11 एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ग्रुप सहभागी झाला होता. शो दरम्यान अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर काही वेळातच तीन विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली. दोन विद्यार्थिनींना तात्काळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले तर एका विद्यार्थ्याला गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॉमा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षीय विद्यार्थिनीचाही सोमवारी मृत्यू झाला. दुसऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत.