वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये पदार्पण करण्यास सज्ज; ठरणार हिंदुस्थानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मध्ये तोडफोड फटकेबाजी करणारा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यासाठी आगामी काळ ऐतिहासिक ठरणार आहे. आयपीएल मधील त्याच्या वादळी कामगिरीमुळे निवड समिती त्याला जून महिन्यात होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघात स्थान देण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत या दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी दिली जाणार असून, त्यात वैभवचे नाव आघाडीवर आहे. जर त्याची निवड झाली, तर तो हिंदुस्थानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल.

वैभवने चालू आयपीएल हंगामात जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूड यांसारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करताना कमालीचा आत्मविश्वास दाखवला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 26 चेंडूत 78 धावा, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अवघ्या 17 चेंडूत 52 धावा कुटल्या आहेत. त्याच्या या बेधडक खेळावर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल आणि माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडूंनी कौतुकाची थाप दिली असून, त्याला लवकरात लवकर हिंदुस्थानी संघात स्थान देण्याची मागणी केली आहे.

PSL चा तिळपापड! IPL ला पसंती दिल्यामुळे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीवर केली कारवाई

जर वैभवने 26 जून रोजी होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले, तर तो सचिन तेंडुलकर आणि शफाली वर्मा या दोघांचेही विक्रम मोडेल. सचिनने 16 व्या वर्षी पदार्पण केले होते, तर शफालीने 15 वर्षे 7 महिने 27 दिवस वय असताना पहिले पाऊल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकले होते. निवड समितीने वैभवाच्या कौशल्यावर विश्वास दाखवला असून, आयर्लंड आणि त्यानंतर होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव देण्याचे नियोजन केले आहे.