
धारावी कोळीवाडय़ाचे सीमांकन अंतिम करण्यासंदर्भात राज्य सरकारला शिफारशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने 2018मध्ये धारावी कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करून मोजणी नकाशा तयार केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडील धारावी पुनर्विकासाशी संबंधित कागदपत्रे या समितीला मागवता येणार आहेत.
या समितीत सदस्य म्हणून जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख पुणे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, मुंबई शहर आणि उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेचे शहर अभियंता, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे संचालक, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांचा समावेश आहे. तर उपसंचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
धारावी कोळीवाडय़ाची सीमा निश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाने हरकती नोंदवल्या आहेत. कोळीवाडय़ाच्या बाह्य सीमांकनास मान्यता देण्यासाठी प्राप्त झालेल्या हरकतींच्या अनुषंगाने कार्यवाही करून शिफारस करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी हरकतदार आणि कोळी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून समितीला अंतिम निष्कर्षापर्यंत यायचे आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प तपासणार
समितीला चौकशीत काही मुद्दय़ांचा समावेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. समितीला आवश्यकतेनुसार मुंबई महापालिका, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडील धारावी पुनर्विकासाशी संबंधित कागदपत्रे मागवता येणार आहेत. याशिवाय समितीला प्रत्यक्ष स्थळ पाहणी करता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.





























































