
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभागृहात चक्क नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार रुपयांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. यामुळे पालिकेतील सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून हे पैसे चोरीला गेले.
महापालिकेची साप्ताहिक स्थायी समिती सभा आज 12 वाजता आयोजित करण्यात आली होती. साधारण पाऊण तासाने सभा संपल्यानंतर सभागृहाशेजारील दालनात सर्वच नगरसेवक जेवणासाठी गेले. यावेळी शिवसेना नगरसेविका लक्ष्मी भाटिया आपल्याकडील पर्स सभागृहात ठेवून जेवण्यासाठी गेल्या, मात्र दहा ते पंधरा मिनिटांनी परत येताच त्यांना आपली पर्स उघडलेली दिसली. त्यातील 20 हजार रुपये पर्समध्ये नसल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केल्यानंतर आपल्या पर्समधून 20 हजारांची चोरी झाल्याचे सांगितले.
पोलिसांत तक्रार करणार
स्थायी समिती सभागृहातील चोरीच्या प्रकारानंतर लक्ष्मी भाटिया यांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासोबत महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची भेट घेऊन तक्रार केली. तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही भाटिया यांनी सांगितले.





























































