
दुसऱ्या महायुद्धाला संपून 80 वर्षे उलटली असली तरी त्याचे भीषण अवशेष आजही जगाला चक्रावून टाकत आहेत. जर्मनीच्या बाल्टिक समुद्रात पडलेल्या तब्बल 16 लाख टन जुन्या दारूगोळ्यावर आता एका नव्या जीवसृष्टीने आपला संसार थाटला आहे. ज्या ठिकाणी केवळ मृत्यू आणि विषारी रसायनांचे साम्राज्य असेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता, तिथे आता मासे, खेकडे आणि स्टारफिश आनंदाने वावरताना दिसत आहेत. शास्त्रज्ञांनी या भागाला समुद्रातील ‘चेर्नोबिल’ असे संबोधले आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीकडे प्रचंड प्रमाणात न वापरलेला दारूगोळा उरला होता. त्याकाळी विल्हेवाटीचा सर्वात सोपा मार्ग म्हणून हा सर्व दारूगोळा समुद्रात फेकून देण्यात आला. जर्मनीच्या ल्यूबेक बेधील हाफक्रुग आणि पेल्जरहाकेन दरम्यान समुद्राच्या तळाशी आजही 16 लाख टन मिसाईल्स, टॉरपीडो आणि बॉम्ब सडत पडले आहेत.
‘सेंकनबर्ग अम मीर’ रिसर्च इन्स्टिट्यूटचे सागरी जीवशास्त्रज्ञ आंद्रे वेदेनिन यांनी ‘ALKOR’ या संशोधन जहाजावरून रिमोट कंट्रोल कॅमेरा (ROV) खाली उतरवला तेव्हा त्यांना अवाक करणारे दृश्य दिसले. अनेक सागरी जीव जसे की अॅनिमोन, स्टारफिश आणि ब्रिसलवर्म यांनी मिसाईल्सच्या धातूच्या भागांना आपली घरे बनवली आहेत. समुद्राच्या तळाशी नैसर्गिक खडकांची कमतरता असल्याने हे जीव संरक्षणासाठी या स्फोटकांच्या धातूच्या आवरणांना चिटकून राहत आहेत. या स्फोटकांमधून TNT सारखी घातक रसायने पाण्यात विरघळत आहेत. तरीही, जिथे थेट स्फोटक उघडे पडले आहेत तो भाग सोडून इतर सर्व धातूच्या भागांवर जीवसृष्टी बहरली आहे.
दरम्यान, जरी जलचरांनी या मृत्यूच्या ढिगाऱ्यावर जीवन निर्माण केले असले तरी हा धोकादायक बदल असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या भागातील पाण्यात TNT चे प्रमाण बाल्टिक समुद्राच्या इतर भागांपेक्षा कितीतरी जास्त आहे. जर हे विष अन्नसाखळीत शिरले, तर माशांमार्फत ते मानवी शरीरापर्यंत पोहोचू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
उपाय काय?
हे स्फोटक आता हळूहळू सडून समुद्राला विषारी करत आहेत. त्यामुळे हे स्फोटक सुरक्षितपणे बाहेर काढून त्या जागी कृत्रिम खडक किंवा सुरक्षित धातूच्या वस्तू ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून तिथल्या जीवसृष्टीचे घरही हिरावले जाणार नाही आणि समुद्राचे पाणीही विषमुक्त राहील, असे संशोधक आंद्रे वेदेनिन यांनी म्हटले आहे.



























































