सामना अग्रलेख – सात्त्विक सूर हरपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदी-मराठी चित्रपट गीते व भावगीतांच्या कर्णमधुर कलाविष्कारात सुमन कल्याणपूर यांनी जे योगदान दिले ते पिढ्यान्पिढयांच्या मनांचा ठाव घेत राहील. पार्श्वगायनाबरोबरच सुमनताईंनी देश-विदेशात गाण्यांचे शो केले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक एका क्षणी गाणे कायमचे सोडून दिले. सहा दशकांच्या कारकीर्दीत जी जी गाणी त्यांच्या वाट्याला आली, त्या गाण्यांचे सुमन कल्याणपूर यांनी अक्षरशः सोने केले. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणाऱ्या सुमनताई आता खूप दूर निघून गेल्या आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीतील सात्त्विक, सोज्वळ व शालीन सूर हरपला आहे. रसिकांच्या हृदयतारा छेडणारी भावगीतांची ही मृदुल सम्राज्ञी इथल्या मैफलीतील ‘भैरवी’ आटपून आता साक्षात सरस्वतीच्या दरबारी गायन सेवा रुजू करण्यासाठी निघाली आहे!

संगीत व गायन कलेच्या दुनियेतील कमालीचा कोमल स्वर रविवारी कायमचा शांत झाला. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने तीन पिढयांना मंत्रमुग्ध करणारा सुरेल व गोड गळा मूक झाला आहे. सुमनताई म्हणजे अत्यंत मधुर, निर्मळ आणि रेशमी वस्त्रासम सुळसुळीत मुलायम आवाजाचे दैवी लेणेच होते जणू. सुमनताईंचा आवाज म्हणजे शालीनतेचा साज. सुमनताईंनी थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल 740 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, किशोर कुमार, मन्ना डे या त्या काळच्या आघाडीच्या सर्व गायकांसोबत त्यांची गाणी आली व गाजलीसुद्धा. मोहम्मद रफीसोबत तर त्यांनी एकापेक्षा एक सरस अशी तब्बल 140 युगुल गीते गायिली. ओ.पी. नय्यर, नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल, हेमंत कुमार या संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. सुमनताईंचे वडील शंकरराव हेमाडी बांगलादेशची राजधानी ढाका येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होते. ढाक्यातच सुमनताईंचा जन्म झाला, परंतु वडिलांच्या मुंबईत झालेल्या बदलीनंतर सुमनताईंचे आयुष्यच बदलून गेले. मुंबईत शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत असतानाच गायकीपेक्षाही त्यांचा ओढा होता तो चित्रकलेकडे. त्यामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेश घेऊन त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. मात्र याच सुमारास एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तलत महमूदने त्यांचे गाणे ऐकले व तत्काळ तलतने एचएमव्हीकडे सुमनताईंची शिफारस केली. तिथूनच त्यांचा चित्रपट संगीताचा प्रवास सुरू झाला. ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबांपर’, ‘रहे ना रहे हम महेका करे’, ‘मेरा प्यार भी तू ये बहार भी तू’, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’, ‘तुमसे ओ हसिना कभी मोहब्बत ना मैने करनी थी’, ‘बहेनाने भाई की कलाई में’, ‘जिंदगी इन्तिहान लेती है’, ‘न तूम हमे जानो न हम तुम्हे जाने’, ‘तुमने पुकारा और हम चले आए’ यांसारखी त्यांची

कितीतरी गाणी

तुफान लोकप्रिय झाली. याशिवाय मराठी, बंगाली, उडिया, कानडी, राजस्थानी, पंजाबी व भोजपुरी भाषांमध्येही त्यांनी असंख्य गाणी गायिली. चित्रपट गीतांसोबत गझल, ठुमरी व भक्तिगीते हे त्यांचे आवडीचे प्रांत. मात्र त्यांच्या हृदयाच्या अत्यंत निकट होती ती मराठी भावगीते. दशरथ पुजारी, वसंत प्रभू, अशोक पत्की, कमलाकर भागवत, विश्वनाथ मोरे या मराठी संगीतकारांचा साज आणि सुमनताईंचा स्वर यातून कितीतरी अजरामर गीतांचा जन्म झाला. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’, ‘अरे संसार संसार’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘शब्द शब्द जपुनी ठेव’, ‘जिथे सागरा…’, ‘मृदुल करांनी छेडीत तारा’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा’ अशी कितीतरी त्यांची अजरामर भावगीते व भक्तिगीते सांगता येतील. ‘निंबोणीच्या झाडामागे चंद झोपला गं बाई’ हे त्यांचे अंगाई गीत तर महाराष्ट्रातील मायमाऊलींनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पुन्हा ही सगळी हिंदी-मराठी गाणी कधी लोकप्रिय होत होती, तर हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात! तेही स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या गाण्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर, एकूणच संगीत क्षेत्रावर व रसिकांच्याही मनावर गारुड केलेले असताना! या अत्यंत प्रभावी वलयासमोर एक उत्कृष्ट गायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणं ही सामान्य गोष्ट नक्कीच नव्हती. सुमन कल्याणपूर यांनी ही ओळख निर्माण केली व टिकवलीसुद्धा. पुन्हा आपल्या संपूर्ण संगीत प्रवासात त्यांनी कधी कुणाशी ना स्पर्धा केली ना तुलना. संगीत क्षेत्रातील जाणकार, रसिक आणि सामान्य श्रोते सुमन कल्याणपूर व लता मंगेशकर यांच्या आवाजाची नक्कीच तुलना करीत. आवाजाचा पोत,

सुरलता आणि सुमधुर

तानांमधील हुबेहूब साधर्म्य यामुळे हा आवाज लतादीदींचा की सुमनताईंचा? असा प्रश्न रसिकांना तेव्हाही पडत होता व कित्येक वर्षांनंतर अनेक गाण्यांबाबत हा संभ्रम आजही कायम आहे. आवाजातील कमालीचा गोडवा हा समान धागा दोघींच्या गाण्यात होता. या तुलनेवरून एका मुलाखतीत ‘‘तुमचा आवाज लता मंगेशकरांसारखा कसा?’’ या प्रश्नावर सुमनताईंनी दिलेले उत्तर अतिशय सुंदर होते… ‘‘कदाचित आम्ही दोघी एकाच वेळी परमेश्वराकडे गाण्याचा गळा मागायला गेलो असू. देवाने मग दोघींनाही अर्धा-अर्धा आवाज वाटून आधी लतादीदींना व मग मला पाठवले असावे.’’ रसिक श्रोतेही ही तुलना करत असले व स्पर्धेचे गॉसिप त्या काळी चर्चिले गेले तरी सुमनताई व लतादीदींचे नाते अतिशय मधुर होते. हिंदी-मराठी चित्रपट गीते व भावगीतांच्या कर्णमधुर कलाविष्कारात सुमन कल्याणपूर यांनी जे योगदान दिले ते पिढ्यान्पिढयांच्या मनांचा ठाव घेत राहील. पार्श्वगायनाबरोबरच सुमनताईंनी देशविदेशात गाण्यांचे शो केले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक एका क्षणी गाणे कायमचे सोडून दिले. सहा दशकांच्या कारकीर्दीत जी जी गाणी त्यांच्या वाट्याला आली, त्या गाण्यांचे सुमन कल्याणपूर यांनी अक्षरशः सोने केले. प्रसिद्धीपासून कायम दूर राहणाऱ्या सुमनताई आता खूप दूर निघून गेल्या आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीतील सात्त्विक, सोज्वळ व शालीन सूर हरपला आहे. रसिकांच्या हृदयतारा छेडणारी भावगीतांची ही मृदुल सम्राज्ञी इथल्या मैफलीतील ‘भैरवी’ आटपून आता साक्षात सरस्वतीच्या दरबारी गायनसेवा रुजू करण्यासाठी निघाली आहे!