
पश्चिम बंगालमध्ये आज राजकीय दरोडा पडला. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केलेल्या आमदारांनीच अख्खा पक्ष चोरला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या तृणमूलच्या ८० आमदारांपैकी तब्बल ६० आमदार फुटले. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला झटपट मान्यता देत विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बंडखोर गटाचे नेते ऋतव्रत बॅनर्जी यांची नियुक्ती जाहीर केली. त्यानंतर फुटीर गटाने पटापट मुख्य प्रतोद आणि चार उपनेते नेमले. अनेक वर्षे कष्ट करून ‘तृणमूल ‘ला वटवृक्ष बनवणाऱ्या लढवय्या नेत्या ममता बॅनर्जी यांना हा मुळापासून हादरा मानला जात आहे. महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात भाजपचा ‘तोडफोड पॅटर्न’ समोर आला आहे.
भाजपशी जवळीक साधून पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवून ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच ऋतव्रत बॅनर्जी व संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर अचानक बंगालमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. ऋतव्रत यांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली. तृणमूलच्या दोन-तृतीयांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी संसदीय पक्ष व विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला. ५८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आज दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज त्यांच्या गटाला मान्यता दिली. विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होताच ऋतव्रत यांनी आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा केली. चीफ व्हिप आणि चार उपनेत्यांची निवड जाहीर केली. या घडामोडींमुळे बंगालचे राजकारण ढवळून निघाले आहे.
ममतांनीच नेतृत्व करावं !
विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ऋतव्रत यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘आमच्या गटाला आता ५८ आमदारांचा पाठिंबा आहे. आणखी दोन आमदार आमच्यासोबत येणार आहेत. त्यांनी औपचारिक घोषणा केली की, आमची ताकद आणखी वाढेल,’ असे ते म्हणाले. ‘ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांना पत्र लिहून आम्ही तशी विनंती करणार आहोत,’ असे ऋतव्रत बॅनर्जी म्हणाले.
अभिषेक यांच्यावर राग
बंडखोर गटातील आमदारांचा खरा राग तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आहे. ऋतव्रत बॅनर्जी यांनी तो बोलून दाखवला. ‘अभिषेक बॅनर्जी यांच्याशी आमचा कुठलाही संवाद नाही. त्यांचा जनतेशीही काही संबंध नाही. त्यांना जनतेचा अजिबात पाठिंबा नाही,’ असे ऋतव्रत म्हणाले. ‘विजयाचे श्रेय घेता तर पराभवाची जबाबदारीही घेता आली पाहिजे,’ असे म्हणत आमदार संदीपान साहा यांनीही अभिषेक यांच्यावर टीका केली.
तृणमूल काँग्रेसच्या सर्व समित्या बरखास्त
राज्यातील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या सर्व अंगीकृत समित्या व सेल तत्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने संघटनेची रचना जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले
कार्यकर्ते दीदींसोबतच!
‘काही लोक पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत; पण तृणमूल आणि ममता वेगळ्या नाहीत. पक्षाचे सर्व कार्यकर्ते दीदींच्या मागे आहेत. निलंबित आमदारांनी हिंमत असेल तर तृणमूलचे पक्षचिन्ह न घेता निवडणूक लढवून दाखवावी,’ असे आव्हान पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी

























































