
मुंबईत बुधवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असताना अनेक ठिकाणी खड्डय़ांनी डोके वर काढले, तर काही भागात पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. शिवाय काही ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे पावसाळ्याआधीच पालिकेच्या पावसाळापूर्व कामे आणि नालेसफाईची पोलखोल झाली.
मुंबईत पावसाळ्याआधी बहुतांशी कामे 31 मेपर्यंत पूर्ण करावीत. रस्त्याचे काम सुरू असल्यास ते सुस्थितीत आणून ठेवावे असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले होते. यानुसार पालिकेने काम केले असल्याचा दावा केला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षातील स्थिती यात मोठा फरक दिसत आहे. त्यामुळे विरोधक आक्रमकपणे प्रशासन आणि सत्ताधाऱयांना धारेवर धरत आहेत. विशेष म्हणजे, खुद्द सत्ताधारीच नालेसफाईसह पावसाळापूर्व कामांबाबत असमाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ‘मुंबईकरांना वाली’, कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
अंधेरीत जादाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये
अंधेरी सबवेतील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेने तीन संभाव्य जागांची निवड केली आहे. अंधेरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जोगेश्वरीतील त्रिकोणी भूखंड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगतची जागा येथे होल्डिंग पाँड उभारण्याचा प्रस्ताव आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून सुमारे 41 हजार घनमीटर पावसाचे पाणी तात्पुरते साठवता येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच अंधेरी सब वेत येणारे नाले वळवण्याचाही पर्याय शोधला जात असून या सर्व उपाययोजनांवर सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आयुक्त म्हणतात…
पावसामुळे मुंबई पूर्णपणे ठप्प होते. ही वस्तुस्थिती नसल्याचे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे. अनेक वेळा सोशल मीडिया आणि अंदाजानुसार अतिशयोक्ती करून दाखवली जात असल्याचेही भिडे यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. पावसाचे पाणी साचू नये यासाठी ठिकठिकाणी उच्च क्षमतेचे पंप, भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































