प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी! जगज्जेत्या कार्लसनला सात दिवसांत दुसऱ्यांदा हरवले, आनंदनंतर एकाच स्पर्धेत कार्लसनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद रमेशबाबू याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन याचा पराभव करत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली. या स्पर्धेत नॉर्वेच्या कार्लसनविरुद्धचा हा त्याचा दुसरा विजय होय.

यापूर्वी 28 मे रोजी प्रज्ञानंदने पांढऱया मोहऱयांनी खेळताना कार्लसनला धूळ चारली होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्याने काळय़ा मोहऱयांसह खेळताना पुन्हा एकदा कार्लसनला नमवत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडली.

या विजयासह एकाच स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला दोनदा पराभूत करणारा प्रज्ञानंद हा हिंदुस्थानचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी 2007 मध्ये हिंदुस्थानचे दिग्गज ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने लिनारेस इंटरनॅशनल बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला सलग दोन सामन्यांत हरवले होते.

गुकेशचा फिरोजाकडून पराभव!

आठव्या फेरीतील अन्य एका लढतीत फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजा याने हिंदुस्थानचा विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश याचा पराभव केला. पांढऱया मोहऱयांनी खेळणाऱया फिरोजाने वेळेच्या दबावाखालील एंडगेममध्ये अचूक डावपेच रचत गुकेशच्या चुका चोखपणे साधल्या. या विजयामुळे फिरोजाच्या खात्यात 13 गुण जमा झाले.

स्पर्धेतील आघाडीवर असलेल्या वेस्ली सो आणि व्हिन्सेंट केमर यांच्यातील क्लासिकल सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन लढतीत वेस्ली सोने बाजी मारत अतिरिक्त गुण मिळवले आणि 14 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. प्रज्ञानंद 12 गुणांसह तिसऱया क्रमांकावर आहे.

महिला विभागात दिव्याला पराभव, हम्पीची आर्मागेडनमध्ये सरशी

महिला विभागात हिंदुस्थानसाठी संमिश्र निकाल पाहायला मिळाले. स्पर्धेत आघाडीवर असलेल्या बिबिसारा असाउबायेवा हिने हिंदुस्थानच्या दिव्या देशमुख हिचा क्लासिकल सामन्यात पराभव केला. काळय़ा मोहऱयांनी खेळताना बिबिसाराने सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. वेळेच्या ताणामुळे दिव्याची पकड सैल झाली आणि तिला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱया एका महत्त्वाच्या सामन्यात झू जिनर हिने विद्यमान महिला विश्वविजेती जू वेनजुन हिला धक्का देत विजय मिळवला.

हिंदुस्थानची अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि ऍना मुझिचुक यांच्यातील क्लासिकल सामना बरोबरीत सुटला, मात्र अतिरिक्त गुणांसाठी झालेल्या आर्मागेडन सामन्यात हम्पीने काळय़ा मोहऱयांसह शानदार विजय मिळवला.

महिला गुणतालिकेत बिबिसारा असाउबायेवा 15.5 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऍना मुझिचुक 10.5 गुणांसह दुसऱया, तर दिव्या देशमुख 10 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.