विधान परिषदेतही फोडाफोडी, भाजपकडून खोक्यांची ऑफर; महायुतीचा बिनविरोध पॅटर्न, बंडोबा झाले थंडोबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण करून बिनविरोध निवडणुका जिंकण्याचा भाजप महायुतीचा पॅटर्न महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकांतही दिसून आला. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने महायुतीत राज्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी उफाळून आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या आणि बंडोबा थंड झाले. महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरणाऱया सहा उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, अहिल्यानगर येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे राज्यात आता विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी लढत होणार आहे. नाशिक, जळगावमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश आले आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने विरोधी उमेदवारांना खोक्यांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेसने केला.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढण्याची घोषणा केल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची आकडेवारी पाहता महायुतीचे पारडे वरचढ असल्याचे दिसत आहे. मात्र, महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी उमेदवारीवरून असंतोष उफाळून आल्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक महायुतीसाठी अवघड झाली होती. यामुळे बंडखोरांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बहुतांश ठिकाणची बंडखोरी थोपविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे.

साताऱ्यात भाजपचा राष्ट्रवादीशी सामना

सातारा-सांगली मतदारसंघात भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विरोधात बंड करणाऱया शिंदे गटाच्या तानाजी पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी आता भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप असा थेट सामना होणार आहे.

नागपुरात अतुल लोंढे विरुद्ध पोतदार

नागपूरमध्ये भाजपचे डॉ. भाजपचे पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे अशी थेट लढत येथे होणार आहे. काँग्रेसचे दुसरे उमेदवार दिनेश ढोले यांच्यासह शेकापचे सुरेंद्र लोही, राजेंद्र जगले यांनी आपले अर्ज मागे घेतले.

भंडाऱ्यात भाजप-अजितदादा गट आमनेसामने

भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राम्हणकर, महायुतीचे बंडखोर अजितदादा गटाचे नरेश ईश्वरकर निवडणुकीत आमनेसामने असणार आहेत. येथून काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतली आहे.

नांदेडमध्ये राजूरकर विरुद्ध रामदास पाटील

नांदेडमध्ये भाजपचे अमर राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील अशी लढत होणार आहे. येथून बंडखोरी करणाऱया अजितदादा गटाच्या प्रविण चिखलीकर यांनी माघार घेतली.

अमरावतीत तिरंगी लढत

अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचितचे नीलेश विश्वकर्मा आमनेसामने आहेत. येथून बंडखोरी करणाऱया शिंदे गटाच्या विप्लव बाजोरीया यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला होता.

परभणीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट

परभणीत शिवसेनेचे डॉ. विवेक नावंदर विरुद्ध शिंदे गटाचे सईद खान असा थेट सामना होणार आहे. अपक्ष सुशील देशमुखही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथून बंडखोरी करणाऱया अजित पवार गटाच्या विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतले.

जळगावात तिरंगी लढत

जळगाव भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि शिवसेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत. शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम असल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाचे आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील तसेच शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी माघार घेतली.

सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत विरुद्ध देशमुख

सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख यांच्यात सामना होणार आहे. काँग्रेसच्या आदित्य फत्तेपुरकर यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता

धाराशीवमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना

धाराशीव-लातूर-बीड मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील विरुद्ध काँग्रेसचे महेश देशमुख असा थेट सामना होणार आहे. येथून अर्ज दाखल करणाऱया सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांची माघार

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाट आणि शिवसेनचे गणेश लोखंडे आमनेसामने आहेत. येथून बंडखोरी करणाऱया शिंदे गटाच्या समीर सत्तार यांनी माघार घेतली, तर शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला.

माघारीमुळे हे झाले विजयी

  • अनिकेत तटकरे
  • रवींद्र फाटक
  • विक्रम काकडे
  • अरुण लखाणी
  • दुष्यंत चतुर्वेदी
  • प्राजक्त तनपुरे

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या दराडेंविरुद्ध गोकुळ गीते, प्रसाद हिरे मैदानात

नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश आले आहे. शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन समर्थक, गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. गणेश गीते यांच्यासह सहा जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेचे बाळ माने यांनी माघार घेतल्याने अजितदादा गटाचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले. ठाण्यात राष्ट्रवादीचे अभिजित पवार यांच्या माघारीने शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांचा मार्ग सुखकर झाला. पुण्यात राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील आणि महायुतीचे बंडखोर सुनील टींगरे आणि प्रदीप कंद यांच्या माघारीमुळे अजितदादा गटाचे विक्रम काकडे यांची निवडणूक बिनविरोध झाली. चंद्रपूरमध्ये कॉँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्या माघारीचा फायदा भाजपच्या अरुण लखाणी यांना झाला. तर यवतमाळमध्ये काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांनी माघार घेतल्याने शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. अहिल्यानगरमधून भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे तनपुरे बिनविरोध निवडून आले.

पैसा फेक तमाशा देख!

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपकडून खोके ऑफर केले गेले, असा गंभीर आराप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केला. भाजपला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टम’ नाही, तर ‘नॉमिनेशन सिस्टम’ हवी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’चा खेळ खुलेआम सुरू आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजप महायुतीने सत्ता, पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे.

या ठिकाणी बिनविरोध

  • ठाणे – रवींद्र फाटक, शिंदे गट
  • रायगड – अनिकेत तटकरे, अजितदादा गट
  • पुणे – विक्रम काकडे, अजितदादा गट
  • चंद्रपूर – अरुण लखाणी, भाजप
  • यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी, शिंदे गट
  • अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे, भाजप

बाळ माने, कृष्णा-देवयानी डोणगावकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्याने बाळ माने, कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. विधान परिषदेसाठी बाळ माने यांना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून, तर देवयानी डोणगावकर यांना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. पक्षविरोधी कारवायांत सहभागी झाल्याने त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली.

माझा बाप काढला, आता माघार नाही – गोकुळ गीते

नाशिकमध्ये भाजपाचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी माझे बंधू गोकुळ यांना अपशब्द वापरले, त्यामुळे ते माघार घेतील की नाही हे सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. गीते काय त्यांचा बाप माघार घेईल, असे विधान कुणाल दराडे यांनी केले होते. यामुळे माझा बाप काढला, आता माघार नाही, असे म्हणत गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला.