
वाढत्या उष्णतेने सर्वांच्याच अंगाची लाही लाही होत असताना आता डोंबिवलीत चक्क माशांना सनस्ट्रोक झाला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर येथील तलावात उष्णतेमुळे मृत माशांचा खच पडला आहे. कडक उष्णता त्याचबरोबर प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मृत माशांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.
गणेश विसर्जन तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलापनगर तलावात मृत मासे पाण्याच्या वर तरंगताना दिसत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर केडीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र केवळ मृत मासे हटवून प्रश्न सुटणार नसून तलावाच्या प्रदूषणाच्या मूळ कारणांवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमधील प्रसिद्ध काळा तलावातही मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरातील जलस्रोतांच्या स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
तातडीने गाळ काढा
अनेक वर्षांपासून तलावातील गाळ काढण्यात आलेला नसल्याने पाण्याची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तलावाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक किंवा साफसफाई कर्मचारी नेमावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि तलावातील गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी तलावातील पाण्याचे तसेच मृत माशांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा सविस्तर अहवाल जाहीर करावा त्यानंतर आवश्यक कारवाई करावी.
– राजू नलवडे, माजी विभागप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)





























































