
अलिबाग तालुक्यातील खंडाळे आयुष्यमान आरोग्य केंद्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून प्रमाणपत्रही मिळाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 92 गुण प्राप्त झालेले खंडाळे हे पहिलेच आयुष्यमान आरोग्य केंद्र ठरले आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (एनक्यूएएस) हा केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत राबवण्यात येणारा महत्त्वाचा गुणवत्ता कार्यक्रम आहे. शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवेची गुणवत्ता, औषधे व साधनसामग्री व्यवस्थापन, रुग्ण तपासणी, स्वच्छता आदी गोष्टींचे सखोल मूल्यमापन करण्यात येते. या अंतर्गत खंडाळे आयुष्यमान केंद्राला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
या उल्लेखनीय यशासाठी आयुष्यमान खंडाळे आरोग्य केंद्राच्या खंडाळेच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता म्हात्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी सपकाळ, पोयनाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मश्री आंघळकर, आरोग्य सेविका मनस्वी वाईरकर, आरोग्य सेवक रविंद्र पगारे व आशा कार्यकर्त्या नेत्रा घरत, स्मिता थळे, नीता घरत, राखी घाटकर, सीमा भगत, श्वेता पाटील, दीपाली मोरे यांनी मेहनत घेतली. तसेच खंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच नाशिकेत कावजी, वाडगावचे सरपंच जयेन्द्र भगत यांचेही सहकार्य लाभले.





























































