
नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भाजी विक्रेत्याची किरकोळ वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टोमॅटोच्या कॅरेटवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाले असून याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. धीरज गुप्ता, रोशन गुप्ता, राजन गुप्ता, अजित गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत.
भाईंदर पूर्वेच्या नवघर परिसरातील हनुमान मंदिराजवळ भाजी मार्केट आहे. २९ मे रोजी सकाळी मार्केटमध्ये टोमॅटोच्या कॅरेटवरून दोन गटांत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी भाजी विक्रेते संतोष सिंह (५३) यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी धीरज गुप्ता याने लोखंडी रॉडने संतोष यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जैन रुग्णालयात आणि त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र २ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मनोज सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी बुधवारी चार आरोपींना अटक केली.





























































